अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने अगोदरच असे आदेश द्यावेत ! -संपादक
नगर – जैन धर्मात पवित्र मानले जाणारे पर्युषण पर्व २४ ऑगस्टपासून आरंभ झाले आहे. जैन धर्माचे अहिंसेचे तत्त्वज्ञान लक्षात घेता पर्युषण काळात कोणत्याही जिवाची हत्या होऊ नये, यासाठी पशूवधगृहे पूर्ण बंद ठेवावीत. पुढील ८ दिवस मांस खरेदी-विक्री होणार नाही, असे आदेश जारी करावेत, अशी मागणी जैन मंदिराचे अध्यक्ष श्री. सुभाष मुथा आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. वसंत लोढा यांनी केली आहे. जैन समाजाने याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संगणकीय पत्राद्वारे निवेदन पाठवले आहे.
श्री. सुभाष मुथा यांनी सांगितले की, पर्युषणाच्या कालावधीत अहिंसा, करुणा आणि मैत्रीचा संदेश प्रसारित केला जातो. जैन धर्माची अंहिसेची व्याख्या अशी आहे की, आपण सर्वांत लहान जिवाच्या आत्म्याला आपला आत्मा मानतो. भगवान महावीर यांनी हेच तत्त्वज्ञान समाजमनात बिंबवले आहे. या काळात प्राणीहत्या टाळलीच पाहिजे. यासाठी देशभरातील पशूवधगृहे पूर्ण बंद रहातील, अशी व्यवस्था सरकारने केली पाहिजे. जैन धर्मियांच्या भावना लक्षात घेऊन समाजाच्या एकमुखी मागणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक प्रतिसाद देतील, असे वाटते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात