Menu Close

पक्षापेक्षा मला धर्मरक्षण अधिक महत्त्वाचे – टी. राजा सिंह

भाजपचे आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांना पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले. या प्रकरणी भाजपकडून त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याविषयी टी. राजा सिंह यांनी म्हटले आहे, ‘मी काहीही चुकीचे म्हटलेले नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पायदळातील प्रामाणिक सैनिक आहे; मात्र पक्षापेक्षा मला धर्मरक्षण करणे अधिक महत्त्वाचे वाटते. मी लकवरच माझ्या व्हिडिओचा दुसरा भाग प्रसारित करणार आहे. त्यात धर्माचा विरोध करणार्‍यांवर टिपण्या केलेल्या असतील.’

मी धर्मासाठी मरायलाही सिद्ध आहे ! – टी. राजा सिंह

आमदार टी. राजा सिंह यांना २३ ऑगस्ट या दिवशी पोलिसांनी घरातून अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यात नेत असतांना ते म्हणाले होते, ‘पोलीस नेमके काय करणार, हे मला ठाऊक नाही. जेव्हा मी सुटेन, तेव्हा निश्‍चितपणे व्हिडिओचा दुसरा भागही आपलोड करेन. मी हे धर्मासाठी करत आहे. मी धर्मासाठी मरायलाही सिद्ध आहे.’ सायंकाळी उशिरा त्यांना न्यायालयाने जामिनावर मुक्त केले.

श्रीरामाचा अवमान करणार्‍यांना सन्मान; मात्र भक्तांना कोणताही मान नाही !

टी. राजा सिंह यांनी पुढे म्हटले होते की, जेव्हा हिंदूंच्या देवतांवर अवमानकारक विनोद ऐकवले जातात, त्यांना लक्ष्य केले जाते, तेव्हा कोणताही गुन्हा नोंदवला जात नाही. आज माझ्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे नोंदवले जात आहेत; पण आमचे देव श्रीराम नाहीत का ? आमची सीता माता नाही का ? आज तेलंगाणातील भक्त विचारत आहेत की, आमचे भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा अवमान करणार्‍यांना संरक्षण का दिले जात आहे ? त्यांना असे संरक्षण दिले जात आहे, जसे पंतप्रधानांनाही मिळत नाही. यातून सरकार जनतेला काय संदेश देऊ इच्छित आहे ? भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा अवमान करणार्‍यांना सन्मान आहे, तर भक्तांना कोणताही मान नाही.

टी. राजा सिंह यांचा एका यु ट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. त्यात त्यांनी विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याच्यावर टीका केली होती. त्याने भाग्यनगर येथे एक कार्यक्रम सादर केला होता. या कार्यक्रमाला टी. राजा सिंह यांनी विरोध केला होता. त्यांनी म्हटले होते, ‘आमचे राम, राम नाहीत ? आमच्या सीता, सीतामाता नाहीत ? मी पोलीस महासंचालकांना हात जोडून विनंती केली होती की, त्यांनी राम आणि सीता यांच्या विरोधात अक्षेपार्ह विनोद करणार्‍या व्यक्तीला कार्यक्रमाची अनुमती देऊ नये.’ त्यांच्या विरोधानंतरही कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमानंतर टी. राजा सिंह यांनी  व्हिडिओ केला होता. त्यात त्यांनी पैगंबर यांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे.

टी. राजा सिंह यांच्या सुटकेनंतर धर्मांधांकडून हिंसाचार : ४ पोलीस घायाळ

टी. राजा सिंह यांना २३ ऑगस्टच्या सायंकाळी उशिरा जामीन मिळाल्यानंतर धर्मांधांनी त्याच रात्री हिंसाचार केला. टी. राजा सिंह यांच्या शिरच्छेदाची धमकी देण्यात आली. या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या संघर्षात ४ पोलीस घायाळ झाले. तसेच पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. पोलिसांनी या वेळी लाठीमार केला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. शहरातील अंबरपेट, तल्लबकट्टा, मोगलपुरा, खिलवत, बहादुरपुरा आणि चंचलगुडा येथे हिंसक निदर्शने करण्यात आली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *