-
भरमसाठ तिकीटदर आकारून गणेशोत्सवानिमित्त गावी जाणार्या भाविकांची लूट करणार्या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात सुराज्य अभियानचे दादर येथे आंदोलन !
-
आंदोलनकर्त्यांचे प्रवासी आणि पोलीस यांच्याकडून अभिनंदन !
जनतेला लुटणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद ! -संपादक
मुंबई, २८ ऑगस्ट (वार्ता.) – राज्य परिवहन विभागाच्या आदेशानुसार एस्.टी. बसगाड्यांच्या तिकीटदराच्या दीडपटपर्यंत खासगी ट्रॅव्हल्सना तिकीटदर आकारता येईल. असे असतांना खासगी ट्रॅव्हल्सवाले एस्.टी. गाड्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट तिकीटदर आकारून गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या भाविकांची आर्थिक लूट करत आहेत. या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत दादर (पूर्व) येथील खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकिंग केंद्राच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या वेळी खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढण्यासाठी आलेले काही प्रवासीही आंदोलनात सहभागी झाले. सर्वसामान्य जनतेसाठी समितीचे कार्यकर्ते करत असलेल्या या आंदोलनाविषयी काही प्रवासी, तसेच बंदोबस्तासाठी असलेले पोलीस यांनी अभिनंदन केले.
१. आंदोलकांनी खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकिंग केंद्राच्या येथे उभे राहून ‘खासगी बसमालकांची मनमानी बंद करा’, ‘कायद्याने प्रवासी भाडे केवळ दीडपट, खासगी बस मालकांकडून प्रवाशांची लुटालूट’, ‘ट्रव्हल्स कंपन्यांनो, प्रवाशांची लूटमार थांबवा’, ‘खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून ग्राहकांची होणारी लूटमार त्वरित बंद करा’, ‘खासगी बसमधून प्रवाशांची लूटमार, वाहतूक नियमांना फासला जात आहे हरताळ’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
२. खासगी ट्रॅव्हल्सकडून चालू असलेल्या या लूटमारीच्या विरोधात पोलीस, परिवहन विभाग, परिवहनमंत्री, मुख्यमंत्री आदींकडे लिखित तक्रार करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. ३. खासगी ट्रॅव्हल्स दरवाढीच्या विरोधात राज्य परिवहन विभाग आणि पोलीस यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करणारे सुराज्य मोहिमेचे श्री. अभिषेक मुरकुटे, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांसह समितीचे कार्यकर्ते हातात फलक धरून सहभागी झाले होते.
आंदोलकांच्या मागण्या !
१. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि मोटार वाहन विभाग यांच्या संकेतस्थळावर ‘हेल्पलाईन’ क्रमांक देण्यात यावा. हा क्रमांक किमान रात्री १२ वाजेपर्यंत चालू असावा.
२. ‘खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांच्या बुकिंगची केंद्राच्या ठिकाणी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार खासगी ट्रॅव्हल्सना अधिकतम किती दर आकारता येईल ?’ याचा तक्ता आणि हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागात ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावा.
३. ‘नियमबाह्य तिकीटदर आकारून लूट करण्याविषयी किती तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यांतील किती जणांवर आणि कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली ?’ याचा तपशील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि मोटार वाहन विभाग यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा.
४. तिकीटदरात नियमबाह्य वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करणार्या ट्रॅव्हल्सवर नियमानुसार प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाई करूनही पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा झाल्यास त्यांच्यावर भा.दं.वि. कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात यावा.
५. मिशो ‘ऑनलाईन अॅप’वर अवैधपणे औषधांची व्रिकी केल्यास ज्याप्रमाणे गुन्हा नोंदवला जातो, त्याप्रमाणे खाजगी प्रवासी टॅ्रव्हल्सच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट विक्री करतांना अवैधपणे अधिकदर आकारणार्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात यावा.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात