सनातन धर्माच्या विरोधात मोहीम उघडणार !
(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजेच द्रविड प्रगती संघ)
- द्रमुक सत्तेत आल्यापासून तमिळनाडूतील फुटीरतावादी आणि हिंदुद्वेषी चळवळींना वेग आला आहे आणि त्याला सरकारकडून समर्थन मिळत आहे, हेही तितकेच खरे !
- खलिस्तानवाद्यांकडून वेगळ्या खलिस्तानची, धर्मांध मुसलमानांकडून ‘इस्लामिस्तान’ची, तर ख्रिस्त्यांकडून पूर्वोत्तर राज्यांना ख्रिस्ती राष्ट्र बनवण्याची भाषा केली जाते आणि त्यासाठी त्यांच्याकडे कृती आराखडाही सिद्ध असल्याचे समोर आले आहे. आता तमिळनाडूतही फुटीरतावादाचे विष कालवले जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! -संपादक
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या सत्ताधारी द्रमुक पक्षाला पाठिंबा देणारा ‘विदुथालाई चिरुथैगल कच्ची’ म्हणजेच ‘वीसीके’च्या नेत्याने तमिळनाडूला भारतापासून विलग करण्याची घोषणा केली आहे. ‘वीसीके’चे उपमहासचिव वन्नी अरासू यांचा ऑगस्टमधील एका जनसभेला संबोधित करतांनाचा व्हिडिओ राज्याचे भाजपचे अध्यक्ष अन्नामलाई यांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. तसेच राज्यातील एम्.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील तमिळनाडू सरकारवर आरोप लावला आहे की, अशी वक्तव्ये करणार्यांवर कारवाई करायची सोडून सरकार त्यांना प्रोत्साहन देत आहे.
१. या व्हिडिओमध्ये अरासू म्हणतांना दिसत आहेत की, भारतापासून राज्याला विलग करण्याची मोहीम १७ ऑगस्टपासून चालू करून पुढील वर्षीच्या १७ ऑगस्टपर्यंत या आंदोलनास विस्तारित करण्यात येईल. या कालावधीत आम्ही सनातन धर्माच्या विरोधात विविध गावांमध्ये प्रचार करू. युवकांना आंदोलनाशी जोडू. पेरियार आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती देऊ. सनातन धर्माच्या विरोधात आम्हाला आमचे प्राण गमवावे लागले, तरी आम्हाला त्याचे काहीही वाटणार नाही.
२. या वक्तव्यावर भाजपने कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यातील भाजपचे सचिव एस्.जी. सूर्या म्हणाले की, आंबेडकर यांनी कधीच फुटीरतावादाला समर्थन दिले नाही. त्यांनी देशाला जोडण्याचे काम केले. त्यांनी राज्यघटना लिहिली. वीसीके पक्ष नेहमीच अशा प्रकारची वक्तव्ये करत आला आहे; परंतु सनातन धर्माच्या विरोधात अरासू यांनी केलेले वक्तव्य पुष्कळ निंदनीय आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या वक्तव्यावर त्यांची भूमिका मांडली पाहिजे, तसेच अरासू यांच्याविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
३. दुसरीकडे ‘वीसीके’ पक्षाचे प्रवक्ते विक्रमन् यांनी मात्र अरासू यांचा बचाव केला आहे. ते म्हणाले की, अरासू यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. त्यांचे म्हणणे होते की, देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत तमिळनाडूने प्राप्त केलेले यश पुष्कळ मोठे आहे. सनातन धर्मावर केलेल्या चिखलफेकीवर विक्रमन् म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष जो सामाजिक न्याय आणि समानता यांचा प्रसार करतो, तो अशा वक्तव्याचा नेहमीच विरोध करील ! (बोलाची कढी आणि बोलाचा भात ही म्हण सार्थ करणारा हिंदुद्वेष्टा ‘वीसीके’ पक्ष ! – संपादक)
स्रोत: दैनिक सनातन प्रभात