-
५ सहस्र वर्षे पुरातन शिव मंदिराच्या परिसरातील श्री गणेश मंदिर !
-
भावना दुखावल्याने भाविक संतप्त !
- पुरातन मंदिराची देखभाल करू न शकणारा पुरातत्व विभाग विसर्जित केला पाहिजे, असे जनतेला वाटते !
- खरे तर पुरातत्व विभागाचे दायित्व असते की, पुरातन मंदिरांची संपूर्ण योग्य प्रकारे देखभाग कशी होईल? ते पहाणे. मंगळवेढा येथील प्राचीन शिव मंदिरातील गणेश मंदिरासमोर घाण होऊ नये, म्हणून पुरातत्व विभागाने उपाययोजना करणे आवश्यक होते. ती त्यांनी केली नाही, म्हणून स्वच्छता राखण्यासाठी भाविकांना उपाययोजना करावी लागली, हे लक्षात घ्यायला हवे !
- श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच श्री गणेश मंदिरासमोरील फरशा तोडणे, हे जाणूनबुजून झाले आहे, असे कुणाला वाटल्यास नवल ते काय ? अन्य पंथियांच्या संदर्भात त्यांच्या सणांच्या वेळी असे करण्याचे धाडस पुरातत्व विभागाने कधी दाखवले असते का ? -संपादक
मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) – येथील माचणूर भागातील ५ सहस्र वर्षे पुरातन श्री शिव मंदिराच्या परिसरातील श्री गणेश मंदिराच्या फरशांची पुरातत्व विभागाने श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच तोडफोड केली. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या कर्मचार्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी संतप्त भाविकांकडून होत आहे.
या शिव मंदिराच्या परिसरात असलेल्या श्री गणेश मंदिराच्या मागे-पुढे अस्वच्छता होत असल्याने एका भाविकाने स्वच्छता रहाण्यासाठी आणि कुणी तिथे घाण करू नये, या उद्देशाने फरशा बसवून घेतल्या होत्या. पुरातत्व विभागाने श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच या फरशा उखडण्यास आरंभ केला. पुजार्यांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर ते काम थांबवण्यात आले.
पुरातत्व विभागाच्या नियमानुसार या फरशा लावल्या गेल्या नसल्या, तरी लावणार्याचा उद्देश चांगला होता. त्यामुळे मंदिरासमोरील अस्वच्छता दूर होऊन पावित्र्य जपले जात होते. ‘पुरातत्व विभागाने इतके वर्षे मंदिराच्या मजबुतीसाठी काय केले ?’ असा प्रश्न भाविक विचारत आहेत. ‘जरी पुरातत्व विभागाच्या नियमाचा भंग झाला, तरी गणेशचतुर्थीला ही कारवाई करणे अपेक्षित होते का ?’ असा प्रश्न भाविक विचारत आहेत. सध्या हे मंदिर जीर्ण झाले असून याचा कारभार पुरातत्व विभागाकडे आहे; मात्र अनेक वेळा तक्रार करूनही पुरातत्व विभाग मंदिराकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून येत आहेत.
औरंगजेबाने या शिव मंदिरात गोमांसाचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याची फुले झाली, असे सांगतात. त्यानंतर औरंगजेबाने देहली दरबारातून या मंदिराला बिदागी चालू केली. आजही हैद्राबाद संस्थानकडून श्रावण मासात या मंदिराला प्रतीवर्षी बिदागी येते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात