Menu Close

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक – कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदूंचा संघर्ष’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

श्री. कुरु थाई

मुंबई – अरुणाचल प्रदेशमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नुकतेच परशुराम कुंडाच्या ठिकाणी भगवान परशुरामाच्या मूर्तीचे उद्घाटन करण्यात आले. याचसमवेत अरुणाचल प्रदेशात पहिल्यांदाच होणार्‍या विमानतळाला राज्य सरकारने स्थानिक नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ‘अरुणाचल प्रदेशचे भगवेकरण होत आहे’, असा कांगावा करण्यात आला. अरुणाचल प्रदेशमध्ये ‘परशुराम कुंड’, पुरातन संस्कृती, परंपरा, धार्मिक स्थळे ही काय भाजपने आणली का ? अरुणाचल प्रदेशमध्ये एकदा ख्रिस्ती धर्म न स्वीकारल्याने महिलेला जिवंत जाळण्याची घटना घडली, तसेच एका मंत्र्याने ख्रिस्त्यांच्या एका मोठ्या उपक्रमाचे उद्घाटन केले, अशा काही घटना घडल्या. त्या वेळी अरुणाचल प्रदेशमधील वृत्तपत्रांमध्ये ‘विदेशी वसाहतवादाचा अरुणाचलमध्ये प्रचार’ असे छापण्यात का आले नाही ? अरुणाचल प्रदेशमधील काही वृत्तपत्रे ख्रिस्ती मिशनरी आणि काही राजकीय पक्ष यांचे मुखपत्र बनली आहेत. हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी त्यांचे षड्यंत्र आहे, तसेच ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराचेही प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत, ते हाणून पाडले पाहिजे, असे प्रतिपादन अरुणाचल प्रदेश सरकारच्या बालसंसाधन आणि विकास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. कुरु थाई यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदूंचा संघर्ष’, या विषयावरील ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते. या वेळी समितीचे श्री. सतिश कोचरेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

श्री. कुरु थाई यांनी विशेष संवादामध्ये मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

१. अरुणाचल प्रदेश ही हिंदूंची तपश्चर्या भूमी आहे आणि तेथे हिंदु बहुसंख्य आहेत. अरुणाचलमध्ये हिंदु बहुसंख्य असूनही हिंदुविरोधी अपप्रचार केला जातो. अरुणाचल प्रदेशमध्ये ४० विविध अनुसूचित जमातीचे लोक रहातात. हे लोक सूर्य, चंद्र, नदी, डोंगर, झाडे आदींची पूजा करतात. या जनजाती हिंदू असूनही त्यांना हिंदु धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

२. अरुणाचल प्रदेश सरकारने संस्कृतीचे जतन करणे आणि धर्मांतर रोखणे यांसाठी ‘द अरुणाचल प्रदेश फ्रीडम ऑफ रिलीजन ॲक्ट, १९७८’ हा कायदा आणला. हा कायदा अजूनही लागू झालेला नसून तो लागू करावा, अशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी आहे.

३. विदेशातून धर्मांतरासाठी येणार्‍या अमाप पैशावर सरकारचे नियंत्रण नसणे, जातीयवाद, निरक्षरता आदी कारणांमुळे हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. चर्च आणि मिशनरी हे ‘गरिबांचे कैवारी आहेत’, असे भासवत असतात; पण प्रत्यक्षात मात्र एकीकडे गरिबांच्या घरांची दुःस्थिती, तर दुसरीकडे आलीशान चर्च उभी रहात आहेत.

४. ख्रिस्ती मिशनरी प्रचार करण्यापूर्वी संबंधित भागातील प्रमुख, गरीब आणि संकटात असलेले आदींना हेरून त्यांना साहाय्य करतात, तसेच नोकरीचे आमीष दाखवून त्यांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करत असतात.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *