आदी गोदरेज यांच्या विधानांचा हिंदु जनजागृती समितीकडून निषेध
मुंबई : हिंदु धर्मीय गायीला पूज्य मानतात, माता मानतात. असे असतांना गोदरेज समूहाचे आदी गोदरेज यांनी गोमांसभक्षणाचे समर्थन करतांना निष्कारण आपली इंग्रजाळलेली बुद्धी पाजळून वैदिक काळात भारतीय गोमांस खात होते. हिंदु धर्मात बीफला कुठलाही विरोध नाही, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. गोदरेज यांनी वेद न वाचताच हे भाष्य केलेले दिसते. वेदांमध्ये अनेक ठिकाणी गोमांसभक्षणाचा केवळ निषेध केलेला नसून गोहत्या करणार्याला कठोर दंड वेदांनी सांगितलेला आहे. नफा-तोट्याच्या व्यापारी बुद्धीने विचार करणारे गोदरेज यांना गोमातेचे महत्त्व कसे कळणार ? गोहत्येविषयी वेदांत काय म्हटले, हे काही क्षण विसरले, तरी गोदरेज यांनी किमान त्यांच्या पारशी धर्मग्रंथाचे वाचन केले असते, तरी त्यांनी असे उद्गार काढले नसते.
पारसी धर्मगुरूंनी अवेस्तातील यस्न, ३८.८ यांतील दुसर्या ओळीत गोमाता, बैल, तसेच वासरे यांचे मांस भक्षण करण्यास वर्ज्य असल्याचे म्हटले आहे. गोदरेज यांच्या विधानांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते, असे समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. गोदरेज यांनी दारुबंदी आणि गोमांसबंदी यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रचंड मोठी हानी होत आहे, असेही म्हटले आहे. गोहत्येमुळे हिंदु संस्कृतीचा नाश होत आहे, दारूमुळे लाखो कुटुंबे देशोधडीला लागली आहेत, हे गोदरेज यांना चालते; मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या व्यापारावर टाच येता कामा नये, अशी स्वार्थी आणि समाजद्रोही भूमिका गोदरेज यांनी घेतली, यातून समाजाला एक चुकीचा संदेश देणारे आदी गोदरेज कसाई आणि मद्यविक्रेते यांचे एजंट आहेत काय ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
२. हठयोगप्रदीपिका (३.४८) मध्ये गोशब्देनोच्यते जिव्हा तत्प्रवेशो ही तालुनि गोमांसभक्षणं तत्तु महापातकनाशनम् ॥, असा उल्लेख असून यात गोया शब्दाचा अर्थ जिव्हा (जीभ) असा आहे. जीभ तालू प्रदेशामध्ये उलट दुमडून ध्यान करणे म्हणजे गोमांसभक्षण होय. या क्रियेने महापातकांचा नाश होतो, असा त्याचा अर्थ आहे; पण स्वार्थी धनदांडग्यांना शब्दार्थ वा भावार्थ समजून घेण्याइतपतही सवड नाही. त्यामुळे ते वेदांचा चुकीचा अर्थ सांगत आहेत.
३. अथर्ववेदात (१.१६.४) गोहत्या करणार्यांना शिशाच्या गोळीने उडवून टाका, असे स्पष्टपणे सांगितले आहे. धर्मग्रंथांतील वचनांचा अर्थ समजून घेण्यासाठी साधना करावी लागते, हेही गोदरेज यांना माहीत नसावे, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे.
४. गोदरेज हे केवळ मद्य-मांसविक्री करणार्या उद्योगपतींच्या तुंबड्या भरण्यासाठीच अशाप्रकारे विधान करत आहेत. देशातील उद्योगांची चिंता असणार्या गोदरेज यांनी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी देशाची फसवणूक करून ९००० कोटी रुपये लुबाडले आहेत, याविषयी तोंड का बंद ठेवले आहे ?
५. आपल्या आईला विकून अथवा कापून खाण्याची हिंदूंची संस्कृती नाही. जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्या गोदरेज यांनी त्यांचे विधान त्वरित मागे घ्यावे अन्यथा गोदरेज समूहाच्या उत्पादनांवर बहिष्कार घालून त्यांना वैध मार्गाने धडा शिकवण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात