-
कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचा आदेश !
-
ज्याप्रमाणे रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली, तशी कारवाई राज्यातील अन्यत्रच्या विभागांनीही करावी !
रत्नागिरी, ५ सप्टेंबर (वार्ता.) – गर्दीच्या काळात शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक तिकीट दर आकारणार्या खासगी कंत्राटी वाहतूकदारांवर कडक कारवाई करावी, असा आदेश रत्नागिरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आला आहे. संबंधित विभागांकडे हा आदेश पाठवण्यात आला असून याविषयी कार्यवाहीचा अहवालही मागवण्यात आला आहे. ‘खासगी ट्रॅव्हल्सचे तिकिटाचे दर किती असावेत ?’, हे प्रवाशांच्या लक्षात यावे, यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या आणि बुकींग केंद्रे या ठिकाणी तिकीट दराची भित्तीपत्रकेही लावण्यात येत आहेत.
१. साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या स्वाक्षरीने २६ ऑगस्ट या दिवशी हा आदेश काढण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अंतर्गत काम करणार्या वायूवेग पथक, महसूल सुरक्षा पथक, इंटरसेप्टर वाहन पथक आदींना हा आदेश कार्यान्वित करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. राज्य परिवहन आयुक्त आणि पनवेल येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनाही या आदेशाची प्रत पाठवण्यात आली आहे.
२. या आदेशात शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गाड्यांच्या प्रकारानुसार खासगी ट्रॅव्हल्सना दीडपटपर्यंत तिकीट दर आकारता येतो; परंतु खासगी ट्रॅव्हल्सकडून अधिक भाडे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याचे परिवहन महामंडळाने म्हटले आहे.
३. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, नाताळ या कालावधीत प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी ये-जा करतात. या पार्श्वभूमीवर खासगी कंत्राटी वाहने सुटण्याच्या ठिकाणी तिकिटाचे दर लावण्यात यावेत, तसेच ‘हेल्पलाईन’ क्रमांकही प्रसारित करण्यात यावा. खासगी गाड्यांच्या ‘बुकींग’च्या ठिकाणी भेट देऊन, तसेच प्रवाशांची संवाद साधून भाडेआकारणी योग्य असल्याची खात्री करावी, असे परिवहन महामंडळाने आदेशात पुढे म्हटले आहे.
यापूर्वी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कृती !
अ. समितीच्या शिष्टमंडळाने १८ मे या दिवशी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन बुकींग केंद्रे आणि बसगाड्या यांवर तिकिटाचे दर लावण्याची, तसेच तक्रारीसाठी ‘हेल्पलाईन’ क्रमांकही प्रसारित करण्याची मागणी केली होती.
आ. २३ मे या दिवशी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन याविषयी कारवाईची मागणी करण्यात आली.
इ. सुराज्य मोहिमेच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार आणि सनातन प्रभातचे प्रतिनिधी यांनी स्वत: पोलीस ठाणे आणि आर्.टी.ओ. यांच्याकडे लेखी तक्रार केल्या.
ई. दादर येथे २८ ऑगस्ट या दिवशी खासगी बुकींग केंद्रांच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते.
संपूर्ण राज्यभर कारवाई करून प्रवाशांची आर्थिक लूट थांबवावी ! – अभिषेक मुरकटे, सुराज्य अभियान, हिंदु जनजागृती समिती
रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत असलेली कार्यवाही अभिनंदनीय आहे; मात्र केवळ आदेश काढून न थांबता त्यानुसार कारवाई होणे आवश्यक आहे. अशा प्रकारची कार्यवाही केवळ रत्नागिरीपुरती सीमित न ठेवता परिवहन आयुक्तांनी राज्यभर चालू करून प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवावी.
तक्रार करण्यासाठी दिलेला दूरभाष क्रमांक कुणी उचलतच नाही !
खासगी ट्रॅव्हल्सकडून अवाजवी तिकीट दर आकारण्यात येत असल्यास त्याविषयी तक्रार करण्यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (०२३५२) २२९४४४ हा दूरभाष क्रमांक देण्यात आला आहे; परतुं दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ५ सप्टेंबर या दिवशी दिवसभरात वेगवेगळ्या वेळांत ५ वेळा दूरध्वनी करूनही दूरभाष कुणीही उचलला नाही.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात