-
१५६ देशांतील नागरिकांचे समर्थन
-
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग
नवी देहली : पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी आणि त्यांच्यावरील अत्याचारांच्या विरोधात त्यांच्या ७०० हून अधिक भक्तांकडून १२ मेपासून येथील जंतरमंतरवर बेमुदत सत्याग्रहाला आरंभ करण्यात आला आहे. जोपर्यंत पू. बापूजींच्या सुटकेचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह चालू रहाणार आहे. सत्याग्रहाचे नेतृत्व अखिल भारतीय नारी रक्षा मंचाच्या सौ. रूपाली दुबे, योग वेदांत सेवा समितीचे श्री. विजय साहनी आदी करत आहेत. १५६ देशांतील नागरिक आणि संस्था यांच्याकडून या आंदोलनाला समर्थन देण्यात आले आहे. यात विश्व हिंदू परिषद, धर्मरक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा समावेश आहे. सत्याग्रहानंतर कारागृह भरा आंदोलन करण्यात येणार आहे. या सत्याग्रहात हिंदु जनजागृती समितीच्या कु. कृतिका खत्री यांनीही मार्गदर्शन केले.
क्षणचित्र : पू. बापूजी यांच्या आश्रमातील श्री. दुर्गेश पांडेय म्हणाले की, सनातन संस्थेच्या साधकांनी म्हटले आहे की, आमचे गुरु आणि पू. बापूजी यांच्यामध्ये कोणताही भेद नाही. यासाठीच आम्ही त्यांच्या समर्थनासाठी उपस्थित आहोत. श्री. दुर्गेश पांडेय सनातन संस्थेविषयी बोलत असतांना उपस्थितांची भावजागृती होत होती. तसेच कु. कृतिका खत्री यांनीही समिती आणि संस्था पू. बापूजी यांच्या समर्थनार्थ उभे असल्याचे सांगितल्यावर उपस्थितांची भावजागृती झाली.
सत्याग्रहाच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे करण्यात आलेल्या मागण्या
१. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावरील खटला रहित करून त्यांची लवकरात लवकर सुटका करावी.
२. पू. बापूजींच्या विरोधात षड्यंत्र रचणार्यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
३. पॉक्सो कायद्यात संशोधन करून तो निष्पक्ष करावा. शासकीय आकडेवारीनुसार या कायद्याच्या अंतर्गत ऑगस्ट २०१२ ते एप्रिल २०१५ पर्यंत ४६ सहस्र गुन्हे दाखल करण्यात आले, त्यातील ७० टक्के गुन्हे खोटे होते. खोट्या गुन्ह्यामुळे पू. बापूजी यांची अपकीर्ती झाली आहे. शासनाने त्यांना पुन्हा सन्मान मिळवून द्यावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात