समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक ! – संपादक
कोल्हापूर, ७ सप्टेंबर (वार्ता.) – शहरातील इराणी खण येथे एका स्वयंचलित यंत्राद्वारे घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. या स्वयंचलित यंत्रामध्ये एक फिरणारा पट्टा असून त्यावर एका बाजूने श्री गणेशमूर्ती ठेवण्यात येत असून त्या पट्ट्यावरून मूर्ती सरकत जाऊन पुढे खणीत विसर्जित होतात. असे करणे हे पूर्णत: धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. याच समवेत महापालिकेने भाविकांकडून घेतलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खण येथे फेकून देतांनाचा ‘व्हिडिओ’ समोर आला असून भाविकांच्या धर्मभावनांचा हा अपमान आहे. तरी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्या ‘रोलर’ची व्यवस्था करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, या मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ७ सप्टेंबर या दिवशी पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. न्यायालय, हरित लवाद अथवा शासन यांनी भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नसतांना कोल्हापूर महापालिका प्रशासन हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणत भाविकांना पंचगंगा नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी आणून इराणी खण, तसेच ठिकठिकाणी विसर्जन कुंडात मूर्ती विसर्जन करण्यास भाग पाडत आहे.
२. श्री गणेशमूर्ती विसर्जन करतांना ती ३ वेळा पाण्यात बुडवून विसर्जित करण्याची प्रथा आहे. तसेच मूर्ती विसर्जित केलेल्या ठिकाणची थोडी माती घरी घेऊन येऊन त्याची पूजा करतात; मात्र ‘रोलर’चा उपयोग केल्याने भाविकांना या कृतीपासून वंचित रहावे लागते. असे करून प्रशासन हिंदूंच्या धार्मिक कृतींवर गदा आणण्याचे काम करत आहे. श्री गणेशमूर्ती विसर्जन हा पूर्णत: धार्मिक विषय असल्याने असे करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्ती, जाणकार यांच्याशी चर्चा केली होती का ?
निवेदन देण्यासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
श्री. संभाजीराव भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना; श्री. राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना; अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, जिल्हामंत्री, विहिंप; सर्वश्री किरण दुसे, बाबासाहेब भोपळे, शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समिती; मनोहर सोरप, जिल्हाध्यक्ष, हिंदु महासभा; राजेंद्र शिंदे, हिंदु महासभा आणि हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री कैलास जाधव, रामभाऊ मेथे, प्रमोद सावंत, तसेच भाजपचे श्री. सतीश पाटील
स्वयंचलित यंत्राद्वारे श्री गणेशमूर्तींचे खणीत विसर्जन !
कोल्हापूर महापालिका प्रशासन भाविकांना पंचगंगा नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करून खण, तसेच ठिकठिकाणी विसर्जन कुंडात मूर्तीविसर्जन करण्यास भाग पाडत आहे. शहरातील काळी खण येथे तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८० लाख रुपये संमत करण्यात आले असून त्या माध्यमातून एका स्वयंचलित यंत्राद्वारे घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. या स्वयंचलीत यंत्रामध्ये एक फिरणारा पट्टा असून त्यावर एका बाजूने श्रीगणेशमूर्ती ठेवण्यात येत असून त्या पटट्यावरून सरकत जाऊन पुढे खणीत विसर्जित होतात. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
पंचगंगा नदीवर प्रशासनाने बॅरॅकेट्स लावून भाविकांना बंदी केली असून अप्रत्यक्षरित्या त्यांच्यासमोर पर्यायच ठेवला नसल्याने भाविकांना नाईलाजास्तव कृत्रिम कुंडात विसर्जन करावे लागत आहे.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
१. हिंदु धर्मशास्त्रात कोणत्याही प्रकारचा आधार नसणार्या आणि लाखो रुपये खर्च करून सिद्ध केलेली स्वयंचलित यंत्र बसवणार्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
२. भाविकांनी श्रद्धेने दान म्हणून दिलेल्या, तसेच कुंडात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खणीत फेकणार्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
३. यापुढील उर्वरित दिवसांमध्ये गणेशोत्सव मंडळांना, तसेच गणेशभक्तांना पूर्वापार धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रातील मूर्तीविसर्जन करण्यास आठकाडी आणू नये.
चौकशी करून प्रशासन योग्य ती कारवाई करेल ! – शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
कोल्हापूर, ७ सप्टेंबर (वार्ता.) – या वेळी हिंदुत्वनिष्ठांशी चर्चा करतांना कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले की, महापालिका प्रशासनाकडून हा प्रकार झालेला नाही. काही ग्रामपंचायतीच्या युवकांच्या खोडसाळपणामुळे झालेला आहे. यासंबंधी प्रशासन योग्य ती कारवाई करेल. आम्ही पहाटे साडेतीन वाजेपर्यंत तेथे होतो, तोपर्यंत असे काही झालेले नव्हते. त्या संदर्भात पोलीस-प्रशासन योग्य ती कारवाई करेल.
ते पुढे म्हणाले की, आपण पुढच्या वर्षी मूर्ती विसर्जनाचे चांगले नियोजन करण्यासाठी आता अनंत चतुर्दशी झाल्यावर बैठक घेऊ. पुढच्या वर्षी शहरामध्ये मोठे कुंड निर्माण करून त्याला विसर्जन घाटाची सुविधा ठेवू. शाडूमातीच्या मूर्ती घडवण्यासाठी कुंभार समाजाला प्रोत्साहन देऊ.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात