Menu Close

भाजपने काश्मिरी पंडितांची पनून काश्मीरची मागणी मान्य न केल्यास देशभरात सहस्रो काश्मीर बनण्याचा धोका ! – प्रमोद मुतालिक

  • विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी एक भारत आंदोलनाच्या अंतर्गत बेंगळुरू येथे महासभा !

  • भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा बेंगळुरू येथे संघटित आविष्कार !

shradhanjali
काश्मीरसाठी बलीदान करणार्‍या सैन्य दलाच्या जवानांना श्रद्धांजली वाहतांना भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

बेंगळुरू : वर्ष १९९० मध्ये भारतातील काश्मिरी हिंदू हे जिहादी आतंकवादाचे पहिले बळी ठरले आणि त्यांना स्वतःचा जीव तसेच महिलांची अब्रू वाचवण्यासाठी आपली भूमी सोडून उर्वरित भारतात विस्थापित व्हावे लागले. या २६ वर्षांत देशात विविध पक्षांची शासने सत्तेवर आली; मात्र काश्मिरी पंडितांची समस्या काही सोडवण्याचा गांभीर्याने प्रयत्न झाला नाही. परिणामी काश्मिरी पंडित काश्मीरच्या खोर्‍यात परतू शकले नाहीत; परंतु काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मात्र आज देशभरात पसरला आहे. देशभरात त्यामुळे सहस्रो काश्मीर बनत असून, तेथूनही हिंदूंना लवकरच विस्थापित होण्याची स्थिती निर्माण होईल. केवळ बेंगळुरूसारख्या महानगराचा विचार केला, तर येथे शस्त्रधारी पोलीसही दिवसाढवळ्या प्रवेश करू शकत नाहीत, अशी ३२ ठिकाणे बेंगळुरू येथे आहेत. जनसामान्यांनी जागृत होऊन कर्करोगाप्रमाणे (कॅन्सरप्रमाणे) पसरणार्‍या देशद्रोहाला थांबवले पाहिजे, अशी माहिती श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे दिली. काश्मिरी पंडितांच्या पनून काश्मीर या स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाच्या मागणीच्या समर्थनासाठी राष्ट्र जागृती समितीच्या वतीने राजाजी नगर येथील राममंदिर मैदानात आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेत ते बोलत होते. या सभेला देशभरातून विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.

या वेळी मुतालिक यांनी देशद्रोही घोषणा देण्याच्या खटल्यातील कन्हैया कुमारसारख्यांना कारागृहात डांबण्याऐवजी माझ्यासारख्या देशभक्तांवर पोलिसांकडून निर्बंध घालण्यात येत असल्याविषयी असमाधान व्यक्त केले.

देशद्रोही कारवाया पाहून ८५व्या वर्षी सुद्धा माझे रक्त सळसळते ! – डॉ. एम्. चिदानंदमूर्ती, ज्येष्ठ इतिहास संशोधक

या वेळी बोलतांना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. एम्. चिदानंदमूर्ती म्हणाले, आज भारतात चालू असलेल्या देशद्रोही कारवाया आणि लिखाण पाहून ८५व्या वर्षी देखील माझे रक्त सळसळते. देहाचे वय झाले आहे, मनाचे नाही. (डॉ. एम्. चिदानंदमूर्ती यांच्यासारखा धर्माभिमान आणि धर्मरक्षणाची तळमळ जर हिंदु तरुणांमध्ये निर्माण झाली, तर हिंदु राष्ट्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा लागू झाला पाहिजे. ब्रिटिशांनी घोषित केलेली रविवारची सुट्टी सोमवारी दिली पाहिजे. इंडिया न म्हणता भारत म्हटले पाहिजे.

फुटिरतावाद्यांचा बोलविता धनी असलेल्या पीडीपीशी केलेली युती भाजपने तोडली पाहिजे ! – डॉ. अग्नीशेखर, राष्ट्रीय समन्वयक, पनून कश्मीर

या सभेसाठी जम्मू येथून आलेले पनून कश्मीर संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अग्नीशेखर या प्रसंगी म्हणाले, वेदकाळापासून काश्मीर भारताशी जोडले गेलेले आहे. तेथील भाषा, संस्कृती, जनसामान्य, इतिहास सर्व भारताचे आहे. कर्नाटकमधील राजकवी बिल्हण हे काश्मिरी होते, तसेच कर्नाटकी संगीताचा महत्त्वाचे अंग असलेला संगीत रत्नाकर ग्रंथ हा काश्मीरमधील शारंगदेव यांनी लिहिलेला आहे. तसेच आद्य शंकराचार्यांनी काश्मीरमधील शारदादेवीला दक्षिण भारतात आणून तिला शारदांबा म्हणून पूजले. त्यामुळे काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. काश्मीरमध्ये हिंदूंचे असणे, म्हणजे भारताचे असणे आहे. अन्यथा तेथील फुटिरतावाद्यांचे षडयंत्र निराळेच आहे. त्यामुळे सर्व भारतियांनी काश्मिरी पंडितांच्या समर्थनार्थ एक व्हायला हवे. मागील शासनांकडून आमची अपेक्षा नव्हती; मात्र आता पीडीपीसह युती केलेल्या भाजपचे वागणे योग्य नाही. ही युती होण्यास २ महिन्यांचा कालावधी का लागला, यावर बोलतांना जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी जाहीरपणे सांगितले की, आम्हाला फुटीरतावाद्यांशी बोलणी करून त्यांची संमती घेण्यासाठी हा विलंब झाला. त्यामुळे फुटिरतावाद्यांचा बोलविता धनी असलेल्या पीडीपीशी केलेली युती भाजपने तोडली पाहिजे. आज विद्यमान शासनाच्या अजेंडा ऑफ अलायंसला (युतीच्या मसुद्याला) आम्ही अजेंडा ऑफ बिट्रेयल (विश्‍वासघाताचा मसुदा) मानत आहोत. जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीडीपी युतीचे शासन काश्मीरी पंडितांना आम्ही त्यांच्या मूळ घरांत पाठवून हळूहळू त्यांना काश्मीरीयतमध्ये एकजीव करू, असे सांगत आहेत. याचा एकप्रकारे अर्थ आम्हाला तेथील आतंकवादीबहुल वातावरणात ढकलून आमचा धर्म-परंपरा संपवून टाकण्याचा होतो; कारण काश्मिरीयत असे वेगळे काही नाही. आज काश्मीरमधील एन.आय.टी.च्या राष्ट्रप्रेमी विद्यार्थ्यांना पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणांना विरोध केल्याने, तसेच भारतमातेचा जयघोष केल्याने प्रचंड मारहाण करून छळ करण्यात आला. तर तेथे आम्ही भारतमातेचे भक्त सुरक्षित कसे राहणार; म्हणून आम्हाला केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा असणारे, जेथे कलम ३७० लागू नसेल, असे पनून काश्मीर हवे आहे.

या सभेला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पनून काश्मीरच्या समर्थनार्थ देशभरात प्रारंभ करण्यात येणार्‍या एक भारत आंदोलनाची व्याप्ती सांगून त्यात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले.

या वेळी बेंगळुरू उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी., श्री करुणेश्‍वर मठाचे सिद्धलींग स्वामीजी, ज्येष्ठ अधिवक्ता एस्. दोरेराजु, हिंदु मक्कल कत्चीचे श्री. अर्जुन संपथ, शिवसेनेचे तामिळनाडू राज्यप्रमुख श्री. राधाकृष्णन, शिवसेनेचे तेलंगण आणि आंध्रप्रदेशचे राज्यप्रमुख श्री. टी.एन्. मुरारी, फोरम फॉर हिंदु जस्टिसचे अधिवक्ता श्री. हरि शंकर जैन, ओडिशा येथून भारत रक्षा मंचचे सर्वश्री. मुरली शर्मा आणि अनिल धीर, तसेच पनून काश्मीरचे युवा शाखेचे श्री. राहुल कौल आणि बेंगळुरु येथील काश्मिरी हिंदूंचे नेते श्री. आर्.के. मट्टू हे ही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *