Menu Close

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा देहत्याग !

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

नवी देहली – बद्रीनाथ येथील ज्योतिष आणि द्वारका येथील शारदा या दोन पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ११ सप्टेंबरच्या दुपारी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील झोतेश्‍वर मंदिरात देहत्याग केला. ते ९९ वर्षांचे होते. ते गेल्या बर्‍याच काळापासून आजारी होते. अलीकडेच म्हणजेच ३ सप्टेंबरच्या दिवशी त्यांचा ९९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ब्रह्मलीन होतांना त्यांचे अनेक शिष्य आणि भक्त त्यांच्या समवेत होते. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी राममंदिराच्या पुनर्उभारणीसाठीच्या न्यायालयीन लढ्यात पुष्कळ कार्य केले होते.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा संक्षिप्त परिचय !

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्यप्रदेशच्या सिवनी येथील  दिघोरी गावात उपाध्याय नावाच्या कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव ‘पोथीराम’ ठेवले. अवघ्या ९ वर्षी त्यांनी घर सोडून धर्मकार्यास वाहून घेतले. त्यांनी काशी येथे जाऊन महान संत धर्मसम्राट श्री करपात्री स्वामीजी महाराज यांच्याकडून वेदशास्त्रांचे शिक्षण घेतले. स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्याने वर्ष १९४२ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ते ‘क्रांतीकारी साधू’ या नावाने प्रसिद्धीस आले. त्यांनी वाराणसी येथे ९ मास, तर मध्यप्रदेशात ६ मासांचा कारावासही भोगला होता.

वर्ष १९५० मध्ये ज्योतिषपीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून त्यांना ब्रह्मदंड देऊन त्यांना संन्यासाची दीक्षा देण्यात आली. तेव्हाच त्यांचे ‘स्वामी स्वरूपानंद सरस्वती’ असे नामकरण करण्यात आले. वर्ष १९८१ मध्ये ते शंकराचार्यपदी विराजमान झाले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *