अमरावती, १३ सप्टेंबर (वार्ता.) – समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती पहाता ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ (कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते) या नियमानुसार आपल्याला कार्य करावे लागेल. आपल्याला अयोध्या मिळाली, आता संघर्ष करून काशी आणि मथुरा मिळवायची आहे. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा. धर्मांधांनी आमच्या मूर्ती तोडून आमचा धर्म संपवण्याचा प्रयत्न केला; परंतु आम्ही सूर्यालाही देवता मानतो, त्याला तुम्ही स्पर्श करू शकणार का ? आम्ही जलाला देवता मानतो, ते तुम्ही नष्ट करू शकणार का ? म्हणूनच अनादी अनंत असा आमचा हिंदु धर्म तुमच्या कुठल्याच प्रयत्नांनी नष्ट होऊ शकणार नाही.
भूमी, जल, आकाश नष्ट झाले, तर धर्मांधही जिवंत राहू शकणार नाहीत, असे मार्गदर्शन कौंडण्यपूर (अमरावती) येथील रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधिश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य यांनी केले. श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर, जिल्हा अमरावती यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशयाग, चिंतामणी गणेश मंदिर स्थापना, संत संमेलन आणि शोभायात्रा असे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ असा उद्घोष उपस्थितांकडून काही वेळ करवून घेतला. या वेळी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळी शहरातील मुख्य मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये विविध संतांचे रथ, वारकरी दिंडी, वनवासी लोकांचे पारंपरिक नृत्य हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुष्पवृष्टी करून आणि शंखनादाने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. या वेळी रथामध्ये उपस्थित सर्व संतांनी कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिला. संत संमेलनाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला.
या प्रसंगी विविध संत, महंत यांच्यासमवेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवटही उपस्थित होते.
भेदभाव झुगारून हिंदु म्हणून संघटित झाल्यासच हिंदु राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील ! – जनार्दन हरीजी महाराज
पूर्वीपासूनच संतांनी हिंदु समाजाला प्रेम देऊन त्यांचे रक्षण केले आहे. त्यांनी कधीही भेदभाव शिकवलेला नाही. त्यामुळे सर्वांनी भेदभाव मनात न ठेवता केवळ हिंदु म्हणून संघटित व्हायला हवे. तसे झाल्यासच हिंदु राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील.
हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्र निर्माण व्हायलाच हवे ! – बालकदासजी महाराज, प्रवक्ते, अखिल भारतीय संत समिती
हिंदु धर्मातील देवता महान असूनही आज आपलेच लोक मजारीच्या (मुसलमानांच्या थडग्याच्या) ठिकाणी दर्शनाला जात आहेत, ही शोकांतिका आहे. हिंदु संस्कृतीवर चिखलफेक करणार्यांचा हिंदूंनी ठामपणे विरोध करायला हवा. हिंदु धर्मावरील संकटे दूर करण्यासाठी लवकरात लवकर हिंदु राष्ट्र निर्माण व्हायला हवे.
भाईचार्याची शिकवण बाजूला ठेवून हिंदूंनी जागरूक व्हावे ! – नारायण भोलेशंकरजी महाराज, हनुमानगढी, अयोध्या
आम्ही हिंदु भाईचार्याच्या गोष्टी करतो, आपण अन्य धर्मियांना भाई मानतो; परंतु ते आपल्याला चारा मानतात. यापुढे असे न होण्यासाठी देशातील हिंदू आता जागरूक व्हायला हवा.
जगद्गुरु, संत, महंत हे ‘केसरी सेने’ची स्थापना करून हिंदु राष्ट्र स्थापन करतील ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.
भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र आणि विश्वगुरु असला, तरीही हिंदु राष्ट्र हा शब्द राज्यघटनेत अंतर्भूत करून तो घोषित करा. प्रभु श्रीरामचंद्रांनी वानरांचे सैन्य निर्माण करून रामराज्याची स्थापना केली, भगवान श्रीकृष्णांनी पांडवांसाठी सेना उभारून धर्मसंस्थापना केली, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांचे सैन्य उभे करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याचप्रमाणे जगद्गुरु, संत, महंत ‘केसरी सेने’ची स्थापना करून हिंदु राष्ट्र स्थापन करतील, असा विश्वास हिंदूंमध्ये निर्माण झाला आहे.
संतांची वंदनीय उपस्थिती !
मालाड, मुंबई येथील श्री टिलाद्वारा गाद्याचार्य मंगल पिठाधिश्वर यज्ञसम्राट श्री श्री १००८ श्री माधवाचार्यजी महाराज, अयोध्या येथील श्री महंत गौरी शंकर दासजी महाराज, निर्मल आखाडा (हरिद्वार) येथील अखिल भारतीय संत समितीचे प्रमुख निर्देशक श्री श्री १००८ निर्मल पिठाधिश्वर श्री महंत ज्ञानदेवसिंहजी,मध्यप्रदेश येथील अखिल भारतीय संत समितीचे संयुक्त राष्ट्रीय महामंत्री महामंडलेश्वर श्री राधे राधे बाबा, हरिद्वार येथील आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री. महेंद्र रविंद्र पुरीजी महाराज,जबलपूर येथील नरसिंग मंदिर, गीताधामचे श्री महंत डॉ. नरसिंग दासजी महाराज, हरिद्वार येथील अखिल भारतीय संत समितीचे केंद्रीय मंत्री ईश्वरदासजी महाराज, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री महंत बालक दासजी महाराज, महामंडलेश्वर आचार्य, गुरुग्रामचे श्री धर्मदेवजी महाराज, अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री हनुमान दासजी महाराज, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडलेश्वर श्री जनार्दश हरीजी महाराज, अमरावती येथील रामप्रिया फाऊंडेशन श्री. रामप्रियाजी माई
कार्यक्रमातील निवडक क्षणचित्रे
१. अमरावती येथील खासदार सौ. नवनीत राणा यांनी कार्यक्रमस्थळी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. त्यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल जिहाद’ हे दोन विषय संसदेत मांडण्याचे आश्वासन दिले.
२. विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री. प्रशांतजी हरताळकर यांच्या समवेत श्री. सुनील घनवट यांनी हलाल जिहादविषयी चर्चा केली.
३. स्वामीजींनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक करत म्हटले, ‘‘समिती निःस्वार्थपणे हिंदु राष्ट्र-जागृतीसाठी कार्य करते. त्यामुळे आपण संत संमेलनामध्ये हिंदु राष्ट्रासाठी शपथबद्ध झालेच पाहिजे.’’
४. या वेळी आमदार रवि राणा, माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी महापौर विलास इंगोले हेही कार्यक्रमाला उपस्थित होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात