आता केंद्र सरकारनेच हिंदूंच्या धर्मस्थळावर बांधण्यात आलेल्या मशिदींचे सर्वेक्षण करून सत्य समोर आणावे आणि हिंदूंना त्यांचा हक्क मिळवून द्यावा, अशीच सामान्य हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक
मथुरा – उत्तरप्रदेशातील मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ही मशीद मोगल काळातील असल्याचे सांगितले जात आहे. ठाकुर केशवदेव मंदिराच्या एका भागावर ही मशीद उभारण्यात आली आहे. अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश शर्मा यांनी ही याचिका मथुराचे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) ज्योती सिंह यांच्या न्यायालयात प्रविष्ट केली आहे.
१. याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता दीपक शर्मा यांनी सांगितले की, न्यायालय या प्रकरणी २६ ऑक्टोबरला सुनावणी करणार आहे. श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित अनेक याचिका यापूर्वीच मथुरेच्या विविध न्यायालयात प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या याचिकेत शाही इदगाह मशीद भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेली असल्याने ती हटवण्यात यावी, अशी मागणी एका याचिकाकर्त्याने केली आहे.
२. ठाकुर केशवदेव महाराज यांच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी ही याचिका दाखल केल्याचा दावा दिनेश शर्मा यांनी केला आहे. ठाकुर केशवदेव महाराज हे मथुरा शहरातील १३.३७ एकर जमिनीचे मालक आहेत, त्यांच्या भूमीवर श्रीकृष्णजन्मभूमी आहे. अशा स्थितीत आता देवतेच्या भूमीवर बांधलेली मीना मशीद हटवण्याची मागणी होत आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात