Menu Close

हिंदूंंची बाजू सत्याची असल्याने अंतिम विजय निश्‍चित – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

रायपूर (छत्तीसगड) येथे ‘हिंदु सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ विषयावर परिसंवाद !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन( उजवीकडे )

रायपूर (छत्तीसगड) – प्रभु श्रीरामचंद्र आणि सर्व देवता यांचे आशीर्वाद आपल्यासमवेत  असल्यामुळे हिंदूंना भयभीत होण्याची काहीच आवश्यकता नाही. प्रत्येक वेळी लढा देण्यासाठी शस्त्रच हाती घ्यायला हवे, असे नाही; तर कायदेशीर लढा दिला, तरीही आपण हिंदूंवर होणारा अन्याय दूर करू शकतो. हिंदु बहुसंख्य असोत किंवा अल्पसंख्य असोत, हिंदूंची बाजू सत्याची आहे. म्हणून हिंदूंनी न्यायालयात कायदेशीर लढा दिला, तर निश्‍चितच अंतिम विजय हा हिंदूंचाच होणार आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. ते ‘हिंदु सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या विषयावरील परिसंवादात बोलत होते. ‘अखिल भारतीय हिंदु स्वाभिमान सेना’, ‘मिशन सनातन’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी ८०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

या वेळी प्रमुख वक्ते म्हणून शदानी दरबार तीर्थ येथील नवम पीठाधीश पू. डॉ. युधिष्ठीरलालजी महाराज, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, ‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीचे मुख्य संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, अखिल भारतीय हिंदु स्वाभिमान सेनेचे संस्थापक श्री. अमित चिमनानी हे उपस्थित होते.

अयोध्या तो एक झांकी है, हिन्दुओं के ४ लाख मंदिर बाकी है ! – श्री. सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी

श्री. सुरेश चव्हाणके

या वेळी श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले, ‘‘हिंदु म्हणजे काय ?’, ‘हिंदुत्व म्हणजे काय ?’, हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. हिंदु संघटित झाल्यावर आणि हिंदु राष्ट्र आल्यावरच खर्‍या अर्थाने हिंदु सुरक्षित होतील. आज हिंदु महिला सुरक्षित नाहीत, हिंदु मुली सुरक्षित नाहीत, हिंदु परंपरा सुरक्षित नाहीत, हिंदु धर्म सुरक्षित नाही, यासाठीच आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे. हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात सुदर्शन वाहिनी नेहमीच वाचा फोडत असते. छत्तीसगडमधील धर्मपरिवर्तन आणि गो-तस्करी या समस्या गंभीर आहेत. हे थांबवायचे असेल, तर राजकीय पक्ष म्हणून विचार न करता आपण सर्वांनी संघटित झाले पाहिजे. व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असू द्या; परंतु त्याने धर्म, राष्ट्र आणि हिंदुत्व यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी आपल्याला मिळाली; परंतु ‘अयोध्या तो एक झांकी है, हिंदू के चार लाख मंदिर बाकी है !’’

 …तर हिंदु राष्ट्र येणे दूर नाही ! – पू. युधिष्ठिर लालजी महाराज, पिठाधीश, शदानी दरबार

या वेळी शदानी दरबारचे नवम पिठाधिश पू. युधिष्ठिर लालजी महाराज यांनी ‘हिंदु संघटनांनी एकत्र येऊन आयोजित केलेला हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे’, असे म्हणत हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. ‘हिंदू असेच संघटित होत राहिले, तर हिंदु राष्ट्र येणे दूर नाही. संत समाज आणि शदानी दरबार या कार्यात कायम समवेत राहील’, असेही महाराजांनी सर्वांना आश्‍वस्त केले.

देवतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी सर्वांनी उपासना करणे आवश्यक ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर म्हणाले की, हिंदूंच्या ३३ कोटी देवतांचे विशिष्ट असे कार्य आहे. धर्मकार्य करण्यास त्या त्या देवतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी सर्वांनी उपासना करणे आवश्यक आहे. हिंदु धर्मावर वाढत असलेली विविध जिहादी संकटे दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय आहे.

‘हलाल मुक्त दीपावली’ साजरी करण्याचा संकल्प करा ! – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

आज ‘हलाल’ हा शब्द केवळ प्राण्यांच्या मांसापर्यंत सीमित न रहाता खाद्यपदार्थ, मॉल आणि ‘मॅकडोनाल्ड’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय आस्थापनांनासुद्धा ‘हलाल सर्टिफिकेट’ घेत आहेत. ‘हलाल सर्टिफिकेट’ देणार्‍या संस्था आतंकवादी कारवायांसाठी अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य करत आहेत. त्यामुळे आपण ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार टाकायला हवा. यावर्षी आपण राज्यात ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा निश्‍चय करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी केले.‘हिंदुत्वाचा कार्यक्रम म्हणजे केवळ राजकीय कार्यक्रम असेच सर्वांना वाटते; परंतु हा कार्यक्रम पाहून हिंदुत्वाचा असा कार्यक्रम होऊ शकतो, हे आज सिद्ध झाले. आता आपण ‘गढबो नवा छत्तीसगढ’ (छत्तीसगड घडवा) अशी घोषणा देण्यापेक्षा ‘गढबो हिंदु राष्ट्र छत्तीसगढ’ अशी उद्घोष करायला हवा, असेही श्री. घनवट म्हणाले.

हिंदु कुठेही अडचणीमध्ये असला, तर त्याला आपण साहाय्य केले पाहिजे ! – श्री. अमित चिमनानी, संस्थापक,  हिंदु स्वाभिमान सेना

अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि श्री. सुरेश चव्हाणके यांच्या पाठीशी सर्व समाज आणि पूर्ण छत्तीसगड आहे. छत्तीसगडची भूमी ही ऐतिहासिक अशी आध्यात्मिक भूमी आहे. स्वामी विवेकानंदांची कर्मभूमी आहे. माता कौशल्याचे जन्मस्थळ आहे. या भूमीतून अनेकांमध्ये शौर्य निर्माण होते. ‘गर्व से कहो हम हिंदू है !’ असे म्हणत भगव्याची शक्ती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. हिंदू कुठेही अडचणीमध्ये असला, तर त्याला आपण साहाय्य केले पाहिजे. आपण सर्वांनी संघटितपणे कार्य केले पाहिजे.

क्षणचित्रे

१. या चर्चासत्राचा उद्देश श्री. मदन मोहन उपाध्याय यांनी स्पष्ट केला, तर श्री. मदन मोहन उपाध्याय आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनुभूती टवलारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

२. कु. अरायाना चिमनानी आणि कु. वैष्णवी उपाध्याय या दोन लहान रणरागिणींनी गीत आणि कविता यांच्या माध्यमातून हिंदु धर्मरक्षणार्थ कार्यरत होण्यासाठी हिंदु समाजाला आवाहन केले. ३. या वेळी वक्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तसेच कृतीशील हिंदुत्वनिष्ठ पदाधिकार्‍यांचाही सत्कार श्री. सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते करण्यात आला.

३. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांचा सन्मान अखिल भारतीय हिंदु स्वाभिमान सेना, मिशन सनातन या संघटनांच्या वतीने करण्यात आला.

४. धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सेवा केली.

५. कार्यक्रमात अनेक साधू, संत, महंत यांची उपस्थिती लाभली.

६. वक्त्यांच्या भाषणांना उपस्थित धर्मप्रेमींनी हात उंचावून, तसेच घोषणा देऊन प्रतिसाद दिला.

७. प्रारंभी हिंदु जनजागृती समितीच्या ‘हलाल जिहाद’ या हिंदी भाषिक ग्रंथाचे लोकार्पण मान्यवर वक्त्यांच्या हस्ते करण्यात आले. ‘हलाल जिहाद’च्या ग्रंथप्रदर्शनाला पुष्कळ प्रतिसाद मिळाला.

८. अनेक मान्यवर आणि धर्मप्रेमी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्याविषयी आयोजक अन् हिंदु जनजागृती समिती यांचे कौतुक केले.

९. भिलाई आणि कोरबा या ठिकाणी अशा प्रकारे हिंदु राष्ट्र जागृती सभा घ्यावी, अशी मागणी तेथील धर्मप्रेमींद्वारे करण्यात आली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *