Menu Close

हिंदु जनजागृती समितीची यशोगाथा

घटस्थापनेच्या शुभदिनी (उद्या २६ सप्टेंबर या दिवशी) हिंदु जनजागृती समितीचा २१ वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…

हिंदु जनतेच्या हितासाठी कार्य करणार्‍या, तसेच हिंदु राष्ट्राची मागणी रुजवणार्‍या हिंदु जनजागृती समितीला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. २० वर्षांपूर्वी, ७ ऑक्टोबर २००२ या दिवशी अर्थात् आश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे नवरात्रीतील घटस्थापनेच्या शुभदिनी हिंदु जनजागृती समितीची देवतांचा होणारा अनादर रोखण्याच्या उद्देशातून स्थापना झाली. हिंदु जनजागृती समिती धर्मजागृती, धर्मशिक्षण, हिंदूसंघटन, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण या ध्येयपूर्तीसाठी अविरतपणे कार्य करत आहे. खरेतर एक संघटना म्हणून २० वर्षांचा कालावधी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भगवंताच्या कृपेमुळे या

२ दशकांच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे अनेक आघात परतवून लावण्यात, तसेच अनेक आघातांची दाहकता न्यून करण्यात समितीला यश मिळाले आहे. या यशात हिंदु धर्मप्रेमींचा हिंदुत्वासाठीचा लढाऊ बाणा, सक्रीयता यांचाही निश्चितच सहभाग आहे. या दृष्टीने २० वर्षांतील समितीच्या कार्याची यशोगाथा येथे मांडत आहे. समितीला गेल्या २० वर्षांत मिळालेले यश सांगणे, ही आत्मप्रौढी नसून भगवंताच्या चरणी अर्पण केलेले कृतज्ञतापुष्प आहे.

१. धर्मरक्षण

१ अ. देवतांचे विडंबन रोखणे

१ अ १. हिंदुद्वेष्ट्ये म.फि. हुसेन यांच्या अश्लील चित्रप्रदर्शनांना विरोध : बहुतांश हिंदु समाज आस्तिक आहे; पण याच श्रद्धेवर आघात करण्यासाठी धर्मांधांकडून हिंदु देवतांचे विडंबन केले जाते. म.फि. हुसेन हे अशाच धर्मांध आणि हिंदुद्वेष्ट्यांपैकी एक ! म.फि. हुसेन यांनी कलेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांची, तसेच भारतमातेची नग्न आणि अश्लील चित्रे काढली होती. समितीने हुसेन यांच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभारले. त्यांच्या विरोधात देशभरात १ सहस्र २५० हून अधिक पोलीस तक्रारी केल्या. परिणामी हुसेन यांना भारत सोडून कतार या इस्लामी देशात पलायन करावे लागले. ते मरेपर्यंत भारतात परतू शकले नाहीत. अशा प्रकारे हिंदुद्वेष्ट्या आणि भारतद्वेष्ट्या धर्मांध कलाकाराला भारताबाहेर हुसकावून लावण्यात समितीला यश मिळाले. इतकेच नव्हे, तर म.फि. हुसेन यांची शेकडो चित्रप्रदर्शने समितीने वैध मार्गाने बंद पाडली आहेत.

१ अ २. ‘लक्ष्मी बाँब’ फटाक्यांच्या विरोधात जागृती : ‘लक्ष्मी बाँब’ या फटाक्यांच्या विरोधात समितीने अभियान राबवले. लक्ष्मी बाँब फटाके उडवल्यानंतर फटाक्यावरील लक्ष्मीच्या चित्राच्या चिंधड्या होऊन देवीची विटंबना होते. समितीने अनेक वर्षे राबवलेल्या अभियानानंतर आज ‘लक्ष्मी बाँब’ या फटाक्यांच्या निर्मितीचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. फटाक्यांवर देवता किंवा राष्ट्रपुरुष यांची चित्रे असू नयेत, यासाठी समितीचे अभियान अद्यापही चालूच आहे.

१ अ ३. अन्य : आतापर्यंत प्रत्यक्ष आंदोलने करून १७ नाटके, दूरचित्रवाहिनी, तसेच ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवरील ८ मालिका, ४ चित्रपट यांद्वारे होणारे देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखण्यात समितीला यश मिळाले आहे. यात ‘यदा-कदाचित्’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ अशी मराठी नाटके, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘गुरुपौर्णिमा’ आदी चित्रपट, तसेच ‘द लव्ह गुरु’ यासारखा हॉलीवूडचा चित्रपट यांचाही समावेश आहे. विनोदाच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांची टिंगल करणार्‍या मुनव्वर फारूकीचे मुंबई, देहली, गोवा आदी अनेक ठिकाणचे कार्यक्रम समितीच्या विरोधामुळे रहित करण्यात आले आहेत. नुकतेच ‘एक्झॉटिक इंडिया’ आणि ‘ॲमेझॉन’ यांनी श्रीकृष्ण अन् राधा यांचे अत्यंत अश्लील चित्र विक्रीसाठी ठेवले होते, त्याला तीव्र विरोध केल्याने ते दोन्ही त्यांच्या संकेतस्थळांवरून काढण्यात आले. विडंबनात्मक वस्तू विक्रीला ठेवणारी ‘ॲमेझॉन’सारखी आस्थापने यांच्या विरोधातही समितीने वैध मार्गाने लढा देऊन देवतांचा होणारा अनादर रोखण्यात यश मिळवले आहे.

आपण धर्मरक्षणाची प्रामाणिक तळमळ ठेवली, तर अल्प मनुष्यबळ, अपुरी साधनसामुग्री अशा अनेक मर्यादा असतांनाही भगवंतच कसे यश देतो, हे यातून लक्षात येते. इथून पुढच्या काळात हिंदु देवता, श्रद्धास्थाने, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन तर सोडाच, त्यांच्याकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचीही कुणाचे धाडस होणार नाही, अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे.

श्री. रमेश शिंदे

१ आ. हिंदुविरोधी कायद्यांना विरोध

समितीने राष्ट्र आणि धर्म हिताला नख लावणार्‍या काळ्या कायद्यांनाही कडाडून विरोध केला. यामध्ये ‘मंदिर सरकारीकरण कायदा’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’, ‘सांप्रदायिक आणि लक्ष्यित हिंसा विरोधी कायदा’ आदी हिंदुविरोधी कायद्यांचा समावेश आहे.

१ आ १. मंदिर सरकारीकरण कायदा : मंदिरांच्या सुव्यवस्थापनाच्या नावाखाली महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न चालवला होता. समितीने या विरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती करत गावे-शहरे पिंजून काढली. समितीने छेडलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात हा कायदा पारित होऊ शकला नाही. ज्या मंदिरांचे सरकारीकरण यापूर्वीच झाले आहे, ती मंदिरेही सरकारीकरणातून मुक्त होऊन भक्तांच्या स्वाधीन व्हावीत, यासाठी समितीचे राष्ट्रीय स्तरावर अभियान चालू आहे.

१ आ २. जादूटोणाविरोधी कायदा : अशाच प्रकारे महाराष्ट्रात नास्तिकतावादी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ (अंनिस)च्या दबावामुळे हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा उदाहरणार्थ, पंढरपूरची वारी, सत्यनारायणाची पूजा यांना अंधश्रद्धा ठरवून त्यावर कायद्याद्वारे बंदी आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. या विरोधातही समितीने राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले, जनजागृती केली. परिणामी अंनिसने बनवलेल्या कायद्याच्या मसुद्यातील २७ पैकी १५ हिंदुविरोधी कलमे न्यून करून १२ कलमी कायदा अधिसूचनेद्वारे संमत करावा लागला. धर्माचरणावर गदा आणणारी कलमे रहित केल्याने राज्यातील हिंदु जनता धर्माचरण करू शकत आहे. हिंदु संघटित झाले, तर सरकार मनमानीपणे पद्धतीने हिंदुविरोधी कायदे करू शकत नाही, हेच यातून लक्षात येते.

१ इ. राष्ट्रीय हिंदु आंदोलन

वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलनात सहभागी राष्ट्र आणि धर्म प्रेमी

समितीचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलन’ ! राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात समिती गेली १० वर्षे रस्त्यावर उतरून वैध मार्गाने ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलन’ करत आहे. या आंदोलनांमुळे मिळालेल्या यशाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे –

१ इ १. डॉ. झाकीर नाईकवर कारवाई : आतंकवादाची शिकवण देणारा हिंदुद्वेषी डॉ. झाकीर नाईक याच्यावर कारवाई करावी, ही मागणी समितीने राष्ट्रीय हिंदु आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरली होती. याची नोंद घेऊन केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी या झाकीर नाईकचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध शोधले आणि केंद्रशासनाने त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संघटनेवरच बंदी घातली. नाईक याच्या ‘पीस टीव्ही’चे भारतात अवैधपणे चालू असलेले प्रसारणही समितीच्या आंदोलनांमुळे बंद झाले.

१ इ २. इस्लामी देशांतील पीडित हिंदूंसाठी आंदोलन : केंद्र सरकारने ‘सीएए’ अर्थात् ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ संमत केला. त्यापूर्वी समितीने आंदोलनांच्या माध्यमातून बांगलादेश आणि पाकिस्तान येथून जीव वाचवून भारतात आलेल्या निर्वासित हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळावे, यासाठी आवाज उठवला होता. याची नोंद घेऊन केंद्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीला हिंदु जनजागृती समितीलाही आमंत्रित केले. या बैठकीत समितीने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. त्याच प्रकारे बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात समितीने केलेल्या आंदोलनानंतर बांगलादेशच्या वकिलातीनेही आंदोलनात सहभागी प्रतिनिधींना चर्चेला बोलावून घेतले.

१ इ ३. हिंदु उत्सवांच्या काळात रेल्वे किंवा बस तिकिटवाढ मागे घेणे : विविध राज्ये हिंदु उत्सवांच्या काळात रेल्वे किंवा बस तिकीट दरांत वाढ करतात. अशाच प्रकारे तेलंगाणाच्या करीमनगर जिल्ह्यात महाशिवरात्रीला बसच्या तिकिटाचे मूल्य वाढवण्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे शासनाने तिकिटाचे मूल्य न्यून केले. उत्तरप्रदेशमध्येही रेल्वेकडून धार्मिक उत्सवांच्या काळात केलेली तिकीट दरवाढ समितीने केलेल्या आंदोलनामुळे मागे घेण्यात आली.

१ इ ४. इस्लामी विश्वविद्यालयाला विरोध : काही वर्षांपूर्वी हिंदूंचे तीर्थक्षेत्र असलेल्या तिरुपतीच्या परिसरात अवैधरित्या ‘हिरा आंतरराष्ट्रीय इस्लामी विद्यापिठा’ची उभारणी चालू होती. याविरोधात समितीने मोठे जनआंदोलन उभारले. आंदोलन, सभा, पत्रकार परिषद, निवेदन, जनजागृती अशा वेगवेगळ्या माध्यमांतून समितीने त्या विरोधात लढा दिला आणि हिंदूंच्या पवित्र स्थानात उभारल्या जात असलेल्या दुसर्‍या बाबरीचे बांधकाम रोखले.

अशाच प्रकारे घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलणे, बंगालमधील हिंदूंना परंपरेप्रमाणे दुर्गा विसर्जन करण्याचा अधिकार मिळणे, हिंदु नेत्यांच्या हत्या, अवैध मशिदी, अवैध पशूवधगृहे यांना विरोध, अशा हिंदुहिताच्या अनेक विषयांवर समितीने आंदोलन केले आहे. ही ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलने’ धर्मक्रांतीची बीजे आहेत. आंदोलनांतून जनजागृती होऊन त्यातून धर्मक्रांती होऊन पुढे हिंदु राष्ट्र स्थापन होईल. हे या आंदोलनांचे महत्त्व आहे.

२. धर्मजागृती

धर्मजागृती झाली, तरच धर्मरक्षण होऊ शकते. त्या दृष्टीने समिती धर्मजागृतीपर उपक्रम राबवते.

२ अ. लव्ह जिहाद

जेव्हा सर्वधर्मसमभावाच्या भ्रामक कल्पनेमुळे ‘लव्ह जिहाद’चे वास्तव समाजात पचनी पडत नव्हते, तेव्हा समितीने धडाडीने ‘लव्ह जिहाद’विषयी व्याख्याने, लेख, निवेदने, पीडित मुलींचे समुपदेशन आदींच्या माध्यमांतून जागृती केली. ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ प्रकाशित केला. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलींची सुटका करण्यासाठी, तसेच त्यांना मानसिक, आध्यात्मिक आधार देण्यासाठी प्रयत्न केले. ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वातच नाही’, या स्थितीतून आज ‘लव्ह जिहाद’चे वास्तव मान्य करत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, कर्नाटक, गुजरात आदी ११ राज्यांमध्ये याविषयीचा कायदा लागू झाला आहे. या कायद्यासाठी जनमानस निर्माण करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

२ आ. हलाल जिहाद

‘लव्ह जिहाद’प्रमाणेच ‘हलाल जिहाद’ची भयावहता समितीने उघडकीस आणली. हलाल संकल्पना केवळ मांसापुरती मर्यादित नसून खाद्यपदार्थ, दैनंदिन वापरातील अनेक वस्तू आज हलाल प्रमाणित होत आहेत. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून जिहादी विचारसरणीच्या संघटनांकडे सर्वसामान्य नागरिकांचा पैसा जात असून हलाल जिहाद हे भारतीय अर्थव्यवस्थेवरील एक आक्रमणच ठरत आहे. याविषयी समितीने सध्या आंदोलन आरंभले असून ग्रंथही प्रकाशित केला आहे. समितीच्या आंदोलनामुळे लव्ह जिहादप्रमाणेच हलाल जिहादचीही सरकारकडून नोंद घेतली जाऊन ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्था बंद केली जाईल’, अशी आशा आहे.

धर्मजागृतीमुळे धर्मशिक्षित झालेला समाजच हिंदु राष्ट्राची पायाभरणी करील. (क्रमशः वाचा उद्याच्या अंकात)

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *