Menu Close

सनातन धर्माची वैज्ञानिकता लक्षात घेऊन आपण हिंदु धर्मशास्त्र शिकले पाहिजे – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

फरिदाबाद (हरियाणा) – सनातन हिंदु धर्मामध्ये ज्ञान परंपराही सामान्य ज्ञानापासून ब्रह्मज्ञानापर्यंत जाते. आज जे सांगितले जाते की, विज्ञान सर्वतोपरी आहे; पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की, विज्ञानाच्याही पुढे बरेच ज्ञान आहे, जेथे विज्ञान अजूनपर्यंत पोचू शकलेले नाही. वास्तविकता ही आहे की, आज विज्ञान अपूर्ण असूनही आपण ते शिकत आहोत आणि सनातन धर्माचे ज्ञान परिपूर्ण असून सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहोत. त्यामुळे सनातन धर्माची वैज्ञानिकता लक्षात घेऊन आपण हिंदु धर्मशास्त्र शिकले पाहिजे, तसेच ते आचरणात आण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. येथील बालाजी महाविद्यालय, वल्लभगड येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते ‘सनातन धर्माच्या ज्ञान परंपरेचे महत्त्व’ या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमाला ‘बालाजी महाविद्यालया’चे मुख्य संचालक श्री. जगदीश चौधरी आणि समितीचे हरियाणा अन् पंजाब राज्य समन्वयक श्री. कार्तिक साळुंके हेही उपस्थित होते.

श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली अन्य सूत्रे…

१. ज्ञानार्जन कुठपर्यंत करायचे आहे, तर माझा जन्म कशासाठी झाला आहे ? मी या पृथ्वीवर कशासाठी आलो आहे ? आणि माझे कर्म काय आहे ? याविषयी ज्ञान करून घेणे, म्हणजे ‘ईश्वराने मला जन्म कशासाठी दिला आहे ? हे ज्ञान करून घेणे’, हेच अंतिम ज्ञान किंवा ‘ब्रह्मज्ञान’, असे म्हटले आहे.

२. जीवनात प्रत्येक अवस्थेत व्यक्तीने विद्यार्थीदशेतच राहिले पाहिजे. विश्वात अनेक विषय शिकण्यासाठी आहेत. त्यापैकी आपण एका विषयात अभ्यास करून पदवी मिळवतो आणि ‘मला सर्व काही ठाऊक आहे’, अशी एक चुकीची विचारप्रक्रिया आपली होते. वस्तूतः विद्या आणि ज्ञान ग्रहण करणे, हे अमर्यादित असते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *