चंद्रपूर – देशातील केवळ १५ टक्के असणार्या मुसलमान समाजाला इस्लामवर आधारित हलाल हवे आहे; म्हणून ते उर्वरित ८५ टक्के मुसलमानेत्तर जनतेवर लादणे, हे त्यांना घटनेने दिलेल्या धार्मिक आणि ग्राहक अधिकारांच्या विरोधात आहे. त्यामुळे भारत सरकारने ‘रेल्व सेवा’ आणि ‘पर्यटन महामंडळ’ यांसारख्या ज्या निधर्मी संस्थांमध्ये हलाल अन्नपदार्थ पुरवले जातात, ते त्वरित बंद करण्याचे आदेश काढावेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी बलारशा येथील व्यापारी संघटन मेळाव्यात केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री बालाजी मंदिराच्या सभागृहात या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. तेव्हा ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’ यांसारख्या खासगी बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून १०० टक्के हलाल पदार्थांची विक्री असल्याने तेही बंद करण्यात यावे.’’ या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हिंदुत्वनिष्ठ सौ. ज्योती दिलीप मामीडवार यांनी पुढाकार घेला होता. या कार्यक्रमाला पुष्कळ व्यावसायिक उपस्थित होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात