वर्ष २०१३ पासून श्री. विक्रम भावे जे सांगत होते, ते वर्ष २०१६ मध्ये सत्य होत आहे !
पुणे – वर्ष २००६ आणि २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांत अटक केलेले मुसलमान आणि हिंदु आरोपी हे दोघेही निर्दोष आहेत. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह उर्वरित १० हिंदु आरोपी निर्दोष असून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांनी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राचे पत्रकार चंदन हायगुंडे यांना मुलाखत देतांना दिली. श्री. विक्रम भावे हे २००८ मध्ये ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या स्फोटातील एक आरोपी असून ते सध्या जामिनावर मुक्त आहेत.
विक्रम भावे यांचा दोन्ही गटांतील आरोपींशी संपर्क
श्री. विक्रम भावे हे त्यांच्यावरील आरोपांची चौकशी चालू असतांना आधी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातील अंडासेलमध्ये आणि नंतर नवी मुंबईतील तळोजा येथील कारागृहात बंदी होते. तेथे त्यांचा २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील अभिनव भारत संस्थेचे सदस्य असलेले हिंदु आरोपी आणि २००६ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील मुसलमान आरोपी यांच्याशी नियमित संपर्क असायचा. त्यावरून श्री. भावे यांची खात्री पटली होती की, अटक झालेले हिंदु आणि मुसलमान आरोपी निष्पाप आहेत.
दोन्ही प्रकरणांचा सखोल अभ्यास !
श्री. विक्रम भावे यांना २८ मे २०१३ या दिवशी कारागृहातून जामिनावर मुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांनी या दोन्ही बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपपत्र, याचिका आणि इतर कागदपत्रे काळजीपूर्वक वाचून त्यांचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी अधिवक्त्यांचेही साहाय्य घेतले. त्यावरून त्यांची पक्की खात्री पटली की, या दोन्ही प्रकरणांची चौकशी चुकीच्या मार्गाने झाली आणि अटक झालेले आरोपी निष्पाप आहेत. त्यानंतर श्री. भावे यांनी या प्रकरणावर पुस्तक लिहिण्याचा निर्धार केला.
मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात !
श्री. विक्रम भावे यांच्या ११२ पृष्ठसंख्या असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात या पुस्तकात साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सुधाकर चतुर्वेदी आणि इतर आरोपींवर अनेक प्रकरणे आहेत. तसेच वर्ष २००६ मधील बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या मुसलमान आरोपींवरही दोन प्रकरणे आहेत. या बॉम्बस्फोट प्रकरणी झालेल्या चौकशीत कुठलातरी राजकीय अदृश्य हात असावा, असा निष्कर्ष श्री. भावे यांनी या पुस्तकाच्या शेवटी काढला आहे. निष्पाप आरोपींना झालेली अटक ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्या राजवटीत झाली आहे.
ताज्या घडामोडीमुळे भावे आनंदी !
वरील दोन्ही प्रकरणांत हिंदु आणि मुसलमान आरोपींना मुक्त केल्याविषयी श्री. भावे यांनी आनंद व्यक्त केला; मात्र या निष्पाप आरोपींच्या आयुष्यातील उमेदीची वर्षे वाया घालवल्याविषयी उत्तरदायी असलेल्या संबंधितांना शिक्षा व्हावी आणि या निष्पापांना योग्य भरपाई मिळावी, अशी आशा श्री. विक्रम भावे यांनी व्यक्त केली.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात