Menu Close

गोवा : डिचोली येथे श्री दुर्गामाता दौड आणि हिंदु राष्ट्र उभारणीची शपथ !

डिचोली, २ ऑक्टोबर (वार्ता.) – शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २ ऑक्टोबरला सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल येथून श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले.

नवरात्रोत्सवात श्री दुर्गादेवीची शक्ती, भक्ती आणि उपासना यांचे महत्त्व जाणून घेऊन गरबा, दांडिया आदींच्या माध्यमातून जी विकृती या उत्सवात शिरलेली आहे, तिला फाटा देऊन राष्ट्रउभारणीसाठी जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दैवी शक्तीच्या बळावर हिंदवी स्वराज्य उभे केले, तशी आज सर्व हिंदु बांधवांसाठी भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ होणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन उपस्थित सर्व हिंदु बांधवांनी श्री दुर्गामाता दौड झाल्यावर ‘हिंदु राष्ट्र प्रतिज्ञा आणि शपथ’ घेतली. या वेळी उपस्थित सर्व धर्माभिमान्यांच्या चेहर्‍यावर उत्साह आणि धर्मतेज दिसत होते.

डिचोली येथील दुर्गामाता दौडला प्रारंभ करतांना सहभागी हिंदुत्वनिष्ठ

माता जगदंबेची अखंड कृपा संपादन करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र उभारणीसाठी एक शक्तीचा स्रोत या संपूर्ण परिसरात पसरला आहे, असेच चित्र दिसत होते. नवरात्रोत्सवातील साक्षात श्री दुर्गादेवीचे दर्शनच उपस्थित भाविकांनी अनुभवले. या उत्सवात १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या हुंकाराने वातावरण दुमदुमून गेल्याची अनुभूती सर्वांना आली.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री शांतीसागर हावळे यांनी सर्व हिंदु बांधवांनी संस्था, संघटना, जात, पंथ आणि संप्रदाय हे भेद विसरून संघटित होणे का आवश्यक आहे, याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी हिंदु राष्ट्र उभारणीची शपथ आणि प्रार्थना घेतली.

संपूर्ण परिसर ‘श्री दुर्गामाता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’, ‘वन्दे मातरम्’ आणि ‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम्’ या घोषणांनी दुमदुमून गेला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *