प्रशासन आणि पोलीस यांचे असहकार्य !
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) : इचलकरंजी येथील शिवाजीनगर या नागरी वस्तीत असलेले देशी मद्याचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे, या मागणीसाठी या परिसरातील रणरागिणी आता रस्त्यावर उतरल्या आहेत. २ मेपासून सलग तीन दिवस या भागातील महिलांनी आंदोलन चालूच ठेवले. गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत असतांना ४ मे या दिवशी या भागातील महिलांनी मद्याच्या दुकानासमोर बसून भजनाचा कार्यक्रम करून दुकानाकडे येणार्या मद्यपींना समजावण्यासाठी एक वेगळाच उपक्रम राबवला. (प्रशासन आणि पोलीस मद्यबंदी करत नाहीत आणि मद्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने मद्यबंदीसाठी आता महिलांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. चंद्रपूर येथे मद्यबंदीप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांत मद्यबंदी का केली जात नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
गेली अनेक वर्षे या परिसरात देशी मद्याचे दुकान चालू असून त्याचा त्रास वाढत चालला आहे. वारंवार सांगूनसुद्धा दुकान मालक आणि मद्यपी यांना कोणताही फरक पडत नसल्याने अखेर या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. पहिल्या दिवशी मद्य पिण्यासाठी येणार्यांना या महिलांनी लाटण्याचा प्रसाद दिला होता, तर दुसर्या दिवसापासून सनदशीर पद्धतीने हा लढा चालू ठेवण्याचा निर्धार करत दुकानाच्या दारात ठिय्या कायम ठेवला. मद्याचे दुकान कायमस्वरूपी बंद होण्यासाठी हे आंदोलन चालूच रहाणार आहे. हे आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी महिलांवर राजकीय दबाव टाकण्यात येत आहे; मात्र हा दबाव झुगारून महिला आणि तेथील लहान मुले आंदोलनात सहभागी झाली आहेत. (राजकीय दबाव झुगारून आंदोलन चालू ठेवणार्या सर्व महिलांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या आंदोलनात महिला आणि लहान मुले यांचा सहभाग असूनही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची सहकार्याची भूमिका घेतली जात नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त त्या भागामध्ये करण्यात आला नाही. (मद्याच्या दुकानावर कारवाई करायची नाही आणि प्रयत्न करणार्यांना सहकार्य करायचे नाही, ही पोलिसांची भूमिका यामध्ये काही काळेबेरे आहे, या संशयाला वाव देते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात