पाटलीपुत्र (बिहार) – ‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार राज्यातील सारन, वैशाली, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, गया, पाटलीपुत्र, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत हिंदु राष्ट्र संपर्क अभियान पार पडले. या अंतर्गत अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, उद्योजक, मंदिर विश्वस्त आदींसाठी विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले. याला त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानामध्ये समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि उत्तरप्रदेश अन् बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.
१. सारन आणि वैशाली जिल्हा येथे मिळालेला प्रतिसाद : येथील उद्योगपती श्री. दीपक बुबना आणि त्यांचे परिचित यांना ‘हलाल जिहाद’ विषय सांगितल्यावर त्यांनी व्यापारी क्षेत्रात जनजागृती करण्याची सिद्धता दर्शवली. अधिवक्ता शशिकांत वर्मा आणि अधिवक्ता विजय कृष्ण यांनी ‘न्यायालयीन मार्गाने हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी अन्य अधिवक्त्यांना नियमित एकत्र करू’, असे आश्वासन दिले.
२. मुजफ्फरपूर येथे धर्मप्रेमी आणि अधिवक्ता यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :
अ. येथील छाबडा शिव मंदिरात झालेल्या बैठकीत अनेक धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी नियमित धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याचे निश्चित करण्यात आले, तसेच आपापल्या क्षेत्रात हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाच्या अंतर्गत जागृतीपर बैठकांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले.
आ. अधिवक्ता अभिषेक कुमार यांच्या पुढाकाराने येथील धर्मप्रेमी अधिवक्त्यांची एक बैठक पार पडली. ‘हलाल प्रमाणित एकही वस्तू विकत घेणार नाही’, असे उपस्थितांनी निश्चित केले. यासह ‘हलाल जिहाद’विषयी न्यायालयीन मार्गाने चौकशी करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचे ठरवण्यात आले.
३. समस्तीपूर येथे धर्मप्रेमींच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन : येथील नागरबस्ती भागातील धर्मप्रेमी विवेकानंद मिश्र यांच्या पुढाकाराने धर्मप्रेमींच्या ‘हिंदुजागृती’ बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या वेळी श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि हलाल जिहादची भीषणता’ यांविषयी उपस्थितांना अवगत केले. यानंतर धर्मप्रेमींनी ‘पुढील वेळी मोठ्या प्रमाणावर प्रसार करून कार्यक्रमाचे आयोजन करू’, असे सांगितले. अशाच प्रकारे पुसा गावात आणि समस्तीपुर शहरात बैठकांचे आयोजन करण्यात आले.
४. गया येथील ‘विष्णुपद मंदिरा’चे प्रवक्ते आणि कार्यकारी अध्यक्ष यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : येथील ‘विष्णुपद मंदिरा’चे प्रवक्ते श्री. महेश गुप्त आणि कार्यकारी अध्यक्ष श्री. शंभूलाल यांची भेट घेण्यात आली. या वेळी त्यांनी समितीच्या ‘मंदिर संस्कृती रक्षण अभियाना’ची प्रशंसा केली.
क्षणचित्र : मुजफ्फरपूर या बैठकीला ८५ किलोमीटर दूर प्रवास करून पूर्व चंपारण येथूनही धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
पाटलीपुत्र येथील ‘वर्ल्ड ॲस्ट्रो फेडरेशन’च्या ‘एशिया चॅप्टर’चे अध्यक्ष आचार्य अशोककुमार मिश्र यांनी त्यांच्या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा सन्मान केला. तसेच भारतभरात आयोजित होणार्या ज्योतिष संमेलनात समितीच्या कार्याची ओळख व्हावी आणि सर्वांना कार्याचा परिचय व्हावा, यासाठी सद्गुरु सिंगबाळ यांना ‘वक्ता’ म्हणून आमंत्रित केले. |
स्रोत: दैनिक सनातन प्रभात