पुणे, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – भारतात सध्या हलाल उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्यांनाही व्यवसाय करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. पूर्वी हलाल ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुसलमान देशांना उत्पादने निर्यातीसाठी मर्यादित होती; मात्र आता हे क्षेत्र गृहनिर्माण संकुल ते आयुर्वेदिक औषधे येथपर्यंत विस्तारले आहे. भारतामध्ये सरकारच्या एफ्.एस्.एस्.ए.आय. (FSSAI)आणि एफ्.डी.ए. (FDA) या दोन अधिकृत संस्था उत्पादनांचे प्रमाणीकरण करत असतांना वेगळ्या हलाल प्रमाणीकरणाची काय आवश्यकता ? असा प्रश्न उपस्थित करून यंदाची दिवाळी हलालमुक्त करण्यासमवेत देश ‘हलाल उत्पादनमुक्त’ असावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. १५ ऑक्टोबर या दिवशी गांजवे चौक येथील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स पुणे डिव्हिजन’चे पुणे शहर अध्यक्ष गिरीश खत्री हेही उपस्थित होते. श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानांतर्गत हलाल उत्पादनांच्या सक्ती विरोधात पुण्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.
व्यापार्यांनी किती जणांचे प्रमाणपत्र घ्यायचे ? – गिरीश खत्री
हलाल प्रमाणपत्राची सक्ती केल्याने व्यापार्यांनी अजून किती जणांचे प्रमाणपत्र घ्यायचे ? व्यापार्यांना होणार्या या त्रासाला उत्तरदायी कोण ? प्रमाणपत्र सक्ती केल्याने व्यावसायिकांना त्याचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे. तसेच हलाल प्रमाणपत्र सक्तीमुळे जमा झालेला पैसा विधायक कामासाठी वापरला जात नसेल, तर हे प्रमाणपत्र घ्यायचेच कशाला ?, असे प्रश्न ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स पुणे डिव्हिजन’चे पुणे शहर अध्यक्ष गिरीश खत्री यांनी उपस्थित केले. व्यापार्यांची संघटना हलाल प्रमाणपत्र सक्तीविरोधात असून नागरिकांनीही हलाल प्रमाणित उत्पादने वापरू नयेत, असे आवाहन गिरीश खत्री यांनी या वेळी केले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात