लातूर येथील हिंदूसंघटन मेळाव्यात संघटितपणे धर्मकार्य करण्याचा उपस्थित हिंदूंचा निर्धार !
लातूर – वर्ष १९४७ पूर्वी आपल्या पूर्वजांनी परकियांशी लढून हिंदु धर्म टिकवला. धर्माचे रक्षण करून देशाला स्वतंत्र केले; मात्र देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य नाही. वर्तमान लोकशाहीत हिंदु समाज असुरक्षित होत चाललेला आहे. राजकारण्यांनी समाजाला जातीत विभागले. त्यामुळे धर्मांधांची शक्ती वाढत आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. उमाकांत होनराव यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील बालाजी मंदिर सभागृह या ठिकाणी नुकताच वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये अन् लातूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे हेही उपस्थित होते. या वेळी उपस्थित हिंदूंनी संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार केला.
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाच्या अंतर्गत आयोजित या वर्धापनदिन सोहळ्यात श्री. मनोज खाडये आणि श्री. राजन बुणगे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या वेळी ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. वर्धापनदिनाचे सूत्रसंचालन श्री. विपुल भोपळे यांनी केले. वर्धापनदिनाच्या समारोपीय सत्रामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात