Menu Close

चोल राजाच्या काळात अस्तित्वात होता हिंदु धर्म आणि राजाने बांधली होती भव्य हिंदु मंदिरे !

काही दिवसांपूर्वी तमिळनाडूमधील हिंदुद्वेष्टे अभिनेते कमल हासन यांनी ‘राजा चोल यांच्या काळामध्ये हिंदु धर्म नव्हता !’, असे हास्यास्पद विधान केले. खरेतर दिग्दर्शक मणिरत्नम् यांनी ‘पोन्नियिन सेल्वन’ (कावेरी नदीचा पुत्र) या नावाचा तमिळ भाषेतील एक ऐतिहासिक चित्रपट सिद्ध केला आहे. या चित्रपटात त्यांनी इतिहासात होऊन गेलेले चोल साम्राज्य दाखवले आहे. ते साम्राज्य आणि त्या काळात राजा चोल यांनी हिंदु मंदिरांसाठी केलेले कार्य यांच्याविषयी जाणून घेऊया. यावरून अभिनेते कमल हासन यांचे विधान हास्यास्पद कसे आहे, ते लक्षात येईल.

चोल साम्राज्याचा पहिला राजा राजा चोल

१. दक्षिणेतील सर्वाधिक काळ टिकलेले चोल साम्राज्य !

भारतात अनेक राजेमहाराजे होऊन गेले, त्यांचे वंशज आजही इतिहासातील दाखले देतात. ज्याप्रमाणे मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे फडकावले, त्यांनी राज्यात कुशल न्यायव्यवस्था राबवली, त्याच पद्धतीचे चोल साम्राज्य हे दक्षिण भारतात पसरलेले होते. इतिहासकारांच्या मते चोल साम्राज्य हे दक्षिणेतील सर्वाधिक काळ टिकलेले साम्राज्य आहे. सम्राट अशोकाच्या काही अशोक स्तंभांवर या साम्राज्याचे संदर्भ आहेत. ९ व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंत या साम्राज्याने भरभराट केली. या साम्राज्याचा पहिला राजा राजा चोल आणि त्याचा पहिला पुत्र राजेंद्र चोल यांनी सैन्य, आरमार, आर्थिक आणि सांस्कृतिक या सर्वांमध्ये राज्याला संपन्न केले. यांचे साम्राज्य दक्षिणेपासून ते अगदी थेट आग्नेय आशियापर्यंत पोचले होते, तसेच श्रीलंकेतील काही भाग, मालदीवसारखी बेटे आपल्या कह्यात घेतली. राजा राजा चोल ‘सर्वांत पराक्रमी राजा’ म्हणून ओळखला गेला आहे. राजा राजा चोल यांच्या कार्यकाळात साम्राज्यविस्तार मोठ्या प्रमाणावर झाला.

_________________________

२. चोल साम्राज्यात अनेक भव्यदिव्य मंदिरे बांधली जाणे

दक्षिण भारतात आज जी भव्यदिव्य हिंदु मंदिरे उभी आहेत, ती याच चोल साम्राज्यात बांधली गेली आहेत. या साम्राज्याची स्थापना वर्ष ८५० च्या आसपास विजयालयामध्ये झाली. परांतक नावाचा एक पराक्रमी राजा होता; परंतु त्याला शेवटच्या दिवसांत अनेक पराभवांना सामोरे जावे लागले होते. चोल साम्राज्याचा पाया डळमळीत होऊ लागला. राजा राजा चोल हा उदयास आला आणि त्याने सर्व सूत्रे हातात घेऊन साम्राज्याची केवळ भरभराटच केली नाही, तर ते वाढवण्यात त्याचा मोठा हात होता. तंजावरमधील ‘बृहदीश्वर’ हे शिवाचे मंदिर राजा राजा चोल यांनी बांधले होते. १० व्या शतकात बांधलेले हे विशाल मंदिर आजही तसेच आहे. आता ‘युनेस्को’च्या ‘जागतिक वारसा स्थळा’च्या सूचीत त्याचा समावेश आहे.

३. चोल साम्राज्यात सक्षम नौदल, विविध कला, विद्या आणि हिंदु धर्म यांना आश्रय असणे

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार भक्कम होते, त्याच पद्धतीने राजा राजा चोल यांचे नौदल हे काळाच्या पुढचे होते. नौदलात अतिशय कुशल खलाशी होते. सुव्यवस्थित, आवश्यक शस्त्रास्त्रांनी ते सुसज्ज होते. त्याच पद्धतीने या साम्राज्यात विविध कला, विद्या आणि हिंदु धर्म यांना आश्रय होता. इतिहासातील नोंदीनुसार या साम्राज्यातील राजा हा मंत्री आणि राज्याचे अधिकारी यांच्या सल्ल्याने राज्य करत असे. संपूर्ण राज्य अनेक मंडळांमध्ये विभागले गेले होते. जाहीर सभा घेणे, हे यांच्या राजवटीतील एक मुख्य काम होते. या राजवटीत उत्तम अशी सिंचन व्यवस्था करण्यात आली होती. शिल्पकला याच राजवटीत भरभराटीस आली.

४. चोल साम्राज्याचा शेवट

राजा राजा चोलच्या पुत्रानंतर चोल साम्राज्याला ओहोटी लागली. चोल आणि चालुक्य यांच्यात सातत्याने युद्ध होत राहिली. १३ व्या शतकाच्या प्रारंभीला दक्षिण भारतात इतर साम्राज्य उदयास येऊ लागली होती. पांड्या वंशाने हळूहळू साम्राज्य काबीज करण्यास प्रारंभ केला. चोल साम्राज्याचा तिसरा राजा राजेंद्र याचा पराभव पांड्यांनी केला आणि या साम्राज्याचा शेवट झाला. इतिहासकारांच्या मते ‘काही कौटुंबिक कारणांमुळेही चोल साम्राज्य संपुष्टात आले’, असे म्हटले जात आहे.

(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, २८.९.२०२२)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *