Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या विश्‍वव्यापक कार्यात सहभागी व्हा – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

कुणकेरी (सिंधुदुर्ग) येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त सोहळा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण, हिंदु समाजाचे हित जोपासणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीची स्थापना २० वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या ठिकाणी  झाली. चिपळूणमध्ये काही मोजक्या राष्ट्र अन् धर्म प्रेमी नागरिकांनी स्थापन केलेल्या हिंदु जनजागृती समितीचे कार्य आज देशातील २९ राज्ये आणि १७० देशांमध्ये चालू आहे. २० वर्षांपूर्वी लावलेल्या समितीच्या छोट्याशा रोपट्याचे आज एका विश्‍वव्यापी वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रतीच्या कर्तव्यपूर्तीसाठी समितीच्या विश्‍वव्यापक कार्यात सहभागी व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा अन् गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी येथे केले.

डावीकडून श्री. विश्राम सावंत, श्री. पांडुरंग परब, दीपप्रज्वलन करतांना श्री. मनोज खाडये आणि श्री. नामदेव नाईक

हिंदु जनजागृती समितीला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २५ ऑक्टोबर या दिवशी येथे सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात श्री. मनोज खाडये यांनी वरील आवाहन केले.

सोहळ्यात बोलतांना श्री. मनोज खाडये

कुणकेरी ग्रामपंचायतीच्या सभागृहात गावचे सरपंच श्री. विश्राम सावंत, परिसरातील अन्य मान्यवर, तसेच धर्मप्रेमी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी देवस्थानचे मानकरी तथा आंबेगावचे माजी सरपंच श्री. पांडुरंग परब, ‘विविध विकास कार्यकारी सोसायटी, कुणकेरी-आंबेगाव’चे अध्यक्ष श्री. नामदेव नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रतिज्ञा केली.

हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेतांना ग्रामस्थ

या वेळी श्री. खाडये पुढे म्हणाले, ‘‘देश आणि धर्म यांचे रक्षण होऊन समाजाचे जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी व्हावे, यासाठी संपूर्णपणे ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून वैध मार्गाने कार्य करणारी हिंदु जनजागृती समिती ही एक अराजकीय संघटना आहे. या संघटनेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. हिंदु जनजागृती समिती धर्मजागृती, धर्मशिक्षण, हिंदूसंघटन, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण या ध्येयपूर्तीसाठी अविरतपणे कार्य करत आहे. भगवंताच्या कृपेमुळे या २ दशकांच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे अनेक आघात रोखण्यात समितीला यश मिळाले आहे. समितीच्या वतीने देवतांचे विडंबन, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, मंदिर सरकारीकरण, धर्मांतर या धर्मावरील आघातांच्या विरोधात व्यापक जनप्रबोधन करण्यात आले आहे.’’

अभिप्राय

१. श्री. स्वप्नील सावंत,आंबेगाव, सावंतवाडी – हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षणासाठी राबवत असलेले उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत. मला या कार्यात सहभागी व्हायला आवडेल.

२. श्री. प्रवीण परब, कुणकेरी – आजचा कार्यक्रम उत्तम झाला. या कार्यक्रमातून हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांविषयी माहिती मिळाली. सर्वत्रच्या हिंदूंनी हिंदु धर्मावरील आघातांविषयी अधिक जागरूक व्हायला पाहिजे.

३. श्री. नामदेव नाईक, आंबेगाव, सावंतवाडी – आपण हिंदु धर्म रक्षणासाठी जे कार्य हाती घेतले आहे, ते अत्यंत उदात्त आहे. या कार्यात आम्ही निश्‍चितच आपल्यासमवेत आहोत.

सोहळ्याला उपस्थित ग्रामस्थ

हिंदु जनजागृती समितीचे कार्य सर्वांपर्यंत पोचले पाहिजे ! – विश्राम सावंत, सरपंच, कुणकेरी गाव

हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्मरक्षणासाठी करत असलेले कार्य गावातील सर्व लोकांपर्यंत पोचले पाहिजे. यासाठी पुढील मासात समितीचा एक सार्वजनिक कार्यक्रम गावात आयोजित करूया.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *