‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’चे मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन
मुंबई, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – मुंबईवरील ‘२६/११’ च्या आतंकवादी आक्रमणातील आरोपींचे खटले लढण्यासाठी अर्थपुरवठा करणारी ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ ही संघटना हलाल उत्पादनांतून पैसा कमवत आहे. हलाल उत्पादनांतून मिळालेला पैसा मुंबईवरील आतंकवादी आक्रमणातील आरोपींना सोडवण्यासाठी वापरला जात असेल, तर अशा ‘हलाल शो इंडिया’ला पोलीस आणि प्रशासन अनुमती कशी देऊ शकतात ? या कार्यक्रमाला अनुमती देऊन जनतेचा रोष ओढवून घेऊ नका, असे आवाहन ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने मुंबईच्या पोलीस आयुक्तांना केलेे. ७ नोव्हेंबर या दिवशी समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन त्यांना याविषयीचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. मुंबईमधील मरिन लाईन्स येथील इस्लाम जिमखाना येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी ‘ब्लॉसम इंडिया’च्या वतीने हलाल वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
२. मुंबईमधील झवेरी बाजारातील साखळी बाँबस्फोट, देहलीतील जामा मशीदीमधील बाँबस्फोट, पुणे येथील जर्मन बेकरी बाँबस्फोट, वर्ष २००६ चा मालेगाव बाँबस्फोट, कर्णावती (अहमदाबाद) बाँबस्फोट आदी अनेक आतंकवादी कारवायांतील आरोपींना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ने कायदेविषयीचे साहाय्य मिळवून दिले आहे.
३. ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ सध्या ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘इंडियन मुजाहिदीन’, ‘इस्लामिक स्टेट’ अशा विविध आतंकवादी संघटनांशी संबंधित सुमारे ७०० संशयित आरोपींचे खटले लढवत आहे. एखाद्या निरपराध व्यक्तीवर अन्याय झाल्यास तिचा खटला लढवणे आपण समजू शकतो; मात्र प्रत्येक जिहादी आतंकवादी कारवाईत सहभागी असणार्या आणि पोलीस अन्वेषणात दोषी आढळलेल्या सर्व आरोपींना निरपराध मानणे’, हे संशयास्पद आहे.
४. केंद्र सरकारची ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ्.एस्.एस्.आय्.) अन् राज्याचे ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) हे विभाग असतांना वेगळे हलाल प्रमाणपत्र देणे, म्हणजे समांतर कारभार करण्याचा प्रकार गंभीर आहे.
५. या कार्यक्रमाच्या विरोधात समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरून विरोध करतील. त्यामुळे या कार्यक्रमाला अनुमती देण्यात येऊ नये, अशी आम्हा सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने विनंती आहे.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे वक्तव्य गांभीर्याने घ्यावे !
२८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मुंबईमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद झाली. या परिषदेला केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर उपस्थित होते. त्यांनी ‘आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा’ हेच आतंकवादी कारवायांचे मूळ असल्याचे म्हटले होते. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हाच प्रकार होत असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ‘पोलिसांनी परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य गांभीर्याने घ्यावे’, असे आवाहन ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने करण्यात आले.
आझाद मैदानावरील दंगलीचा विचार करून योग्य ती भूमिका घ्यावी !
११ ऑगस्ट २०१२ या दिवशी आझाद मैदानावरील मोर्च्याच्या वेळी दंगल उसळली होती. आंदोलनकर्त्यांनी महिला पोलिसांचा विनयभंग केला. पोलिसांवर आक्रमण करून पोलिसांचा उपमर्द केला. पोलीस, पत्रकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्या गाड्यांची तोडफोड केली होती. तो दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस ठरला. ‘या सर्वांचा गांभीर्यांने विचार करून पोलिसांनी वेळीच योग्य ती भूमिका घ्यावी, असेही कृती समितीच्या निवेदनात म्हटले आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात