लंडन येथील महापौर सादिक खान यांनी नुकतीच निस्डन येथील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. या वेळी त्यांनी मंदिरातील भाविकांशी संवाद साधला; तसेच मंदिराच्या काही धार्मिक विधींमध्येही सहभाग घेतला. या वेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांच्या मनगटावर धागा बांधला. महापौरांच्या मंदिर भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पाकिस्तानात बसचालक असलेले महापौर खान यांचे वडील हे स्थलांतर करून येथे स्थायिक झाले. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये खान यांनी म्हटले आहे, ‘माझे आयुष्य लंडनमध्ये स्थायिक झालेल्या मूळच्या भारतीय वंशाच्या अन्य नागरिकांसारखेच आहे. माझ्या वडिलांनी १९७० मध्ये येथे स्थलांतर केले. लंडनमधील भारतीय समुदायाबरोबर मी नेहमी असेन. लंडनची भारताशी मैत्री दृढ करण्याचा मी प्रयत्न करीन.’
निस्डन येथील स्वामीनारायण मंदिर हे लंडनमधील माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. या विकेंडला पुन्हा या मंदिरात दर्शनासाठी जायला मला फार आवडले, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स