कळंबोली येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेतून हिंदू एकतेचा आविष्कार !
रायगड – छत्रपती शिवरायांकडे शक्तीसमवेत भक्ती होती; म्हणून त्यांनी इतिहास घडवला. आपल्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जगातील अन्य देशांत मोठ्या आदराने शिकवला जातो; मात्र महाराजांचा हा इतिहास आम्हाला पाठपुस्तकांत नीट शिकवला जात नाही आणि आपल्यालाही त्याचे काही वाटत नाही. शिवरायांचा इतिहास युवकांना शिकवून देशभक्त युवा पिढी घडवण्यास पालकांनी पुढाकार घ्यावा. हिंदु तरुण पिढीला धर्मशिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतल्यावर घरोघरी देशभक्त आणि धर्माविषयी ज्ञानी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन कळंबोली येथील ‘वर्तक क्लासेस’चे संचालक श्री. संतोष वर्तक यांनी केले. ते कळंबोली येथे २० नोव्हेंबर या दिवशी पार पडलेल्या सभेत उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी आणि सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनीसुद्धा संबोधित केले.
पनवेल येथील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख श्री. रामदास शेवाळे, भाजपचे कळंबोली शहराध्यक्ष आणि नगरसेवक श्री. रविशेठ पाटील, भाजपचे सचिव आणि स्वामी समर्थ मंडळाचे प्रतिनिधी श्री. संतोष गायकवाड, श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि बजरंग दलाचे पनवेल प्रखंड संयोजक श्री. संतोष मोकल, भाजपच्या उत्तर भारतीय विभाग मंडळाचे अध्यक्ष श्री. केशव यादव, भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे श्री. देविदास खेडकर, पनवेल येथील राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संजय पाटील आदी मान्यवरांसह या सभेला अनेक हिंदूंची उपस्थिती लाभली.
क्षणचित्रे
१. ‘गौरव क्लासेस’चे विद्यार्थी आणि पालक यांची सभेला लक्षणीय उपस्थिती होती.
२. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके समितीच्या युवकांनी या वेळी दाखवली.