पुणे : सवंग लोकप्रियतेसाठी हिंदूंच्या परंपरांना आव्हान देणार्या आणि महाराष्ट्राच्या कन्हैया कुमार ठरलेल्या उपद्रवी तृप्ती देसाई यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणार्या क्रांतीकारकांना आतंकवादी संबोधणार्यांवर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करण्यात येऊन त्यांना शिक्षा करण्यात यावी, तसेच कर्नाटकमधील रायचूर येथील हिंदु मंदिर तोडून त्या ठिकाणी मशीद उभारणार्यांवर कर्नाटक शासनाने कारवाई करून हिंदूंना न्याय द्यावा या मागण्यांसाठी पुणे आणि पिंपरी (जिल्हा पुणे) या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलने करण्यात आली. १५ मे या दिवशी पुणे येथे मंडईतील टिळक पुतळा आणि पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये अनुक्रमे ७० आणि ५० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
पुणे येथे झालेल्या आंदोलनामध्ये सनातन संस्थेचे श्री. प्रवीण कर्वे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संदेश कदम आणि शिवसेनेचे कसबा प्रभाग प्रमुख श्री. मुकुंद चव्हाण, तर पिंपरी येथे सनातन संस्थेच्या कु. उज्ज्वला ढवळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी आणि श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. दत्ताभाऊ गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे येथे झालेल्या आंदोलनात सनातन संस्थेचे श्री. प्रवीण कर्वे म्हणाले की, मंदिरांच्या गाभार्यात प्रवेश करण्याचा विषय हा स्त्री-पुरुष समानतेचा नसून पूर्णतः अध्यात्मशास्त्राशी निगडित आहे. ज्यांचा अध्यात्मशास्त्राचा अभ्यासच नाही आणि देवावर श्रद्धा नाही अशा, तृप्ती देसाई या सवंग प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी आंदोलने करत आहेत.
राष्ट्रपुरुषांचा अवमान करणे आणि विद्यार्थ्यांच्या मनात खोटा इतिहास बिंबवणे हा देशद्रोहच असल्याचे मत श्री. संदेश कदम यांनी व्यक्त केले.
क्षणचित्रे
१. पिंपरी येथे झालेल्या आंदोलनामध्ये निवेदनावर स्वाक्षरी करण्यासाठी आलेले काही धर्माभिमानी हिंदू स्वतःहून आंदोलनामध्येही सहभागी झाले.
२. पुणे आणि पिंपरी येथे दोन्ही ठिकाणी गणवेशातील, तसेच साध्या वेशातील पोलीस उपस्थित होते. त्यांनी आंदोलनाचे ध्वनीचित्रीकरण केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात