राजस्थानमध्ये काँग्रेसवाल्यांच्या मोर्च्यात आय.एस्.आय.एस्.च्या समर्थनार्थ घोषणा दिल्यानंतर २४ घंटे उलटूनही पोलिसांनी कुणावरही कारवाई केलेली नाही. याउलट पुण्यात भाजपच्याच आमदारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाच्या प्रकरणी तत्परतेने गुन्हा नोंदवण्यात येतो, ही पुणे पोलिसांची मोगलाईच ! आता हिंदूंनी त्यांना घटनेने दिलेल्या अधिकारानुसार वैध मार्गाने निषेधही नोंदवायचा नाही का ?
आगामी बाजीराव-मस्तानी या चित्रपटाच्या विरोधात पुणे येथे आंदोलन केल्याचे प्रकरण
पुणे : १८ डिसेंबरला प्रदर्शित होणार असलेला हिंदुद्रोही चित्रपट बाजीराव-मस्तानी या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह गोष्टी, चित्रपटातून पिंगा हे गाणे काढावे, या आणि अन्य मागण्यांसाठी १२ डिसेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले होते. शनिवारवाड्यावर झालेल्या या आंदोलनाला पेशव्यांचे वंशज डॉ. उदयसिंह पेशवे, श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे सरकार, भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या आंदोलनात चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संजय भन्साळी यांचा पुतळा जाळण्यात आला. या प्रकरणी विनाअनुमती मोर्चा काढणे आणि पुतळा जाळल्याप्रकरणी आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्यासह १४ जण आणि त्या व्यतिरिक्त ७० ते ८० जणांच्या जमावाच्या विरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे. (हिंदूंच्या वैध मार्गाने केलेल्या आंदोलनाचे पुणे पोलिसांना वावडे का ? आतंकवादी प्रवृत्तीच्या धर्मांधांच्या समोर थंड बसणार्या पोलिसांनी हिंदूंवर मात्र तत्परतेने गुन्हा नोंदवायला हा भारत आहे कि पाक ? – संपादक)
त्या १४ जणांमध्ये वरील मान्यवरांसह श्री. कुंदनकुमार साठे, ज्येष्ठ अभिनेते श्री. श्रीकांत मोघे, नगरसेवक मिलिंद काची, पेशव्यांचे वंशज डॉ. श्री. महेंद्रसिंह पेशवे, श्री. मंदार लवाटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, श्री. शशिकांत लेले, श्री. अनिल गानू, समाजसेविका अनुराधा सहस्रबुद्धे, समाजसेवक श्री. विलास तुपे, श्री. संजय कोटणीस यांचा समावेश आहे. हे वृत्त दैनिक लोकमतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, तर पुणे येथील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात श्री. कुंदनकुमार साठे, आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी, श्री. श्रीकांत मोघे आणि नगरसेवक मिलिंद काची, तसेच अन्य १० जण असा उल्लेख करण्यात आला आहे.
१. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत भट यांनी सांगितले की, मोर्चा काढण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस यांच्याकडून अनुमती घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विनाअनुमती मोर्चा काढणे, पुतळा जाळणे, पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंंघन करणे आदी कारणांवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी हवालदार प्रभाकर राऊत यांनी तक्रार दिली आहे. (हिंदूंच्या विरोधात पोलीस स्वतः गुन्हा नोंदवतात; मात्र धर्मांध गोभक्षकांच्या विरोधात तक्रार करायला गेलेल्या हिंदूंची तक्रारच नोंदवून घेत नाहीत. अशा पोलिसांकडून हिंदूंना कधीतरी न्याय मिळू शकेल का ? – संपादक)
२. श्री. कुंदनकुमार साठे म्हणाले, मुळातच आम्ही मोर्चा काढला नव्हता. आम्ही केवळ निषेध सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या अनुमतीसाठी आम्ही महानगरपालिकेकडे रितसर आवेदन केले होते; परंतु त्याचे कोणतेही उत्तर आम्हाला मिळालेले नाही. सभेनंतर उत्स्फूर्तपणे भन्साळींचा पुतळा जाळण्यात आला. (हिंदूंनी अनुमती मागितल्यानंतर त्याविषयी काहीही न कळवणे आणि नंतर गुन्हा नोंदवणे, यावरून हे हिंदूविरोधी षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते ! – संपादक)
समाजाने एकत्रित होऊन चित्रपटाला विरोध करावा ! – आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी
आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, आम्ही लोकशाही मार्गाने निषेध नोंदवला होता. आम्ही संस्कृतीवरचे आक्रमण कधीही सहन करणार नाही. इतिहासातील तत्त्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केली जाणारी तडजोड कधीही सहन केली जाणार नाही. त्यामुळेच आम्ही हिंदुद्रोही चित्रपट बाजीराव-मस्तानीवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला, त्या वेळी मी उपस्थित नव्हते. माझ्यावर गुन्हा प्रविष्ट झाला आहे, हे मला वृत्तपत्रातून कळले. कायदेशीर प्रक्रियेला सामोरी जायला मी सिद्ध आहे. हिंदुद्रोही चित्रपटाच्या विरोधात समाजाने एकत्रित होऊन लढा दिला पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन या चित्रपटाला विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.