पुणे : ‘दोन वर्षांत काहीच घडले नाही. दोन वर्षांची माती झाली; पण माणूस चांगला आहे, निष्कलंक आहे. स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया या त्यांच्या योजना चांगल्या आहेत, त्यास उशीर झाला तरी चालेल; पण आधी देशात मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करा, अशी विनंती मी मोदींना करणार आहे,’ असे सडेतोड प्रतिपादन संभाजीराव भिडे यांनी शुक्रवारी केले.
सृजन कॉलेज ऑफ डिझाइन व कलादत्त प्रकाशनामार्फत काढण्यात आलेल्या ‘शिवतेज संभाजी’ या थ्रीडी पुस्तकाचे प्रकाशन पू. भिडे गुरुजी यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. सदाशिव शिवदे, पांडुरंग बलकवडे, माजी खासदार प्रदीप रावत, अभय कुलकर्णी, महेश लडकत, पुस्तकाचे संपादक संतोष रासकर, सुरेश नाशिककर या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर अध्यक्षस्थानी होते.
‘पाणी, दूध, गाळून प्यावे तसे आपण शिवाजी व संभाजी महाराजांना सोयीने स्वीकारले आहे. राष्ट्रातील शत्रूबीज संपवण्याचा विचार त्यांच्या चरित्रांतून दिला आहे. आपल्या जीवनात शिवाजी-संभाजी मार्ग ठसवले पाहिजेत. समाज शिवाजी व संभाजी या रक्तगटाचा बनला पाहिजे,’ अशी अपेक्षा पू. भिडे गुरुजी यांनी व्यक्त केली. ‘शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात करण्याचा काही संबंध नाही. स्मारक करायचे असल्यास ते प्रतापगडाच्या पायथ्याशी करा. अन्यथा आम्ही ते करून दाखवू,’ असा इशारा त्यांनी दिला.
‘रोप-वे’मुळे रायगडाची दुर्दशा
‘स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आली, तरी एकाही आमदाराने औरंगाबादचे नाव बदलण्याची हिंमत दाखवलेली नाही. लोकांना ‘भारत माता की जय’ म्हणण्याची लाज वाटते. काय लायकीचा समाज निर्माण झाला आहे ?’, अशा शब्दांत संभाजीराव भिडे यांनी टीकास्त्र सोडले. ‘रायगडावर रोप वे करून त्याची दुर्दशा केली. त्या ठिकाणी आता लग्न लावली जातात. यापुढे त्या ठिकाणी स्मार्ट सिटी झाली नाही म्हणजे मिळवले,’ असेही ते म्हणाले.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स