मोरजी (गोवा) : परशुरामभूमी गोमंतक ही तपोभूमी, योगभूमी, यज्ञभूमी आहे. गोव्यात गायीला सन्मान नाही, तिची हत्या केली जाते. जोपर्यंत गायीचा सन्मान केला जात नाही, तोपर्यंत आंदोलने चालूच रहातील, असे प्रतिपादन पद्मनाभ शिष्य संप्रदायाच्या कुंइई पीठाचे पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी गोवा येथील विठ्ठलदासवाडा, मोरजी येथे जनकल्याण महायज्ञाच्या कार्यक्रमात केले.
पद्मनाभ शिष्य संप्रदायाचा मोरजी संत समाज आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित मोरजी जनकल्याण महायज्ञाच्या कार्यक्रमात प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी बोलत होते. स्वामी पुढे म्हणाले, मोरजी समुद्रकिनारा हा केवळ पर्यटकांना मौजमजा, उघडे किंवा मादक पदार्थाचे सेवन करून मुक्तपणे संचार करण्यासाठी नाही. हे चित्र पालटले पाहिजे. मोरजी किनारा सोमवती अमावास्येच्या पवित्र समुद्र स्नानासाठी प्रसिद्ध आहे. मोरजीवासीयांनी अमावास्येला समुद्रस्नान करून विदेशी पर्यटकांसमोर भारतीय संस्कृतीचे चित्र उभे करायला हवे.
मंचावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी शिक्षणमंत्री संगीता परब, मोरजीच्या सरपंच सीमा सांगळे, पद्मनाभ शिष्य संप्रदायाचे अध्यक्ष रामचंद्र नाईक, संत समाज संघटना अध्यक्ष दिगंबर कालापूरकर, कार्याध्यक्ष बाबी गावकर आदी उपस्थित होते.
हिंदूंच्या धार्मिक संस्थांनी केलेल्या कार्यातून बोध घेऊन मुख्यमंत्री जनतेला व्यसनाधीन बनवणारे कॅसिनो तरी बंद करतील का ?
पद्मनाभ शिष्य संप्रदायाने व्यसनाधीन पिढीला सत्मार्गाला लावण्याचे कार्य केले ! – मुख्यमंत्री पार्सेकर
मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले, पद्मनाभ शिष्य संप्रदाय हा अनेक वर्षे कार्यरत आहे. व्यसनाधीन पिढीला सत्मार्गाला लावण्याचे काम संप्रदायाने केले आहे. समुद्रकिनारा केवळ पर्यटकांच्या मौजेमजेसाठी नसून तेथे जनकल्याण यज्ञ, धार्मिक उत्सव हेही करता येतात, हे संप्रदायाने दाखवून दिले.
वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात