Menu Close

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – मंदिरे कह्यात घेण्याचा कोणताही अधिकार सरकारला दिलेला नाही. मंदिरे चालवणे हे सरकारचे काम नाही. अन्य कोणत्याही पंथाच्या प्रार्थनास्थळाला सरकारने हात लावलेला नाही, मग केवळ हिंदूंचीच मंदिरे सरकारी नियंत्रणाखाली का ? याआधीही मी अनेक मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त केली आहेत. लवकरच पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार. नागरिकांची घरे आणि संतांच्या धर्मशाळा वाचवू, असे आश्‍वासन भाजपचे वरिष्ठ नेते आणि हिंदुत्वनिष्ठ डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी दिले. विठ्ठल मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे, तसेच तेथे उभारण्यात येणारा ‘कारिडॉर’ (सुजज्ज मार्ग) रहित करणे या संदर्भात कायदेशीर मार्गदर्शन आणि विचारविनिमय करण्यासाठी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. स्वामी बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, निवृत्ती महाराज नामदास, चैतन्य महाराज देहूकर, ‘विराट हिंदुस्थान संगम महाराष्ट्र’चे श्री. जगदीशजी शेट्टी, श्री. सत्या सबरवाल, श्री. मनोहर शेट्टी, तिरुपती देवस्थानचे श्री. गोविंदहरि आणि अधिवक्ता धनंजय रानडे उपस्थित होते.

या वेळी डॉ. स्वामी म्हणाले की,

१. हिंदु समाज हा एकसंध राहिला पाहिजे. मंदिराचे सरकारीकरण आणि बळजोरीने होऊ घातलेला ‘कॉरिडॉर’ दोन्ही गोष्टी अन्यायकारक आहेत. मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या संदर्भात पत्र लिहिणार आहे. त्याची त्यांनी तात्काळ याची नोंद घ्यावी, अन्यथा कायदेशीर मार्गाने आम्ही लढा जिंकणारच आहोत.

२. पंढरपूरच्या जागरूक नागरिकांनी ‘कॉरिडॉर’चा विषय आमच्यापर्यंत आणला आणि आम्ही त्यांच्यासमवेत रहाण्याचा निर्णय घेतला. सरकार कोणतेही असो, लोकांना विश्‍वासात घेऊन काम करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकार जागे होत नसेल, तर आम्ही त्याला कर्तव्याची त्यांना जाणीव करून देऊ.

३. लवकरच हे मंदिर सरकारच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करू. या कॉरिडॉर प्रकल्पाला जनतेचा विरोध आहे, तो डावलून दडपशाहीचा प्रयत्न झाला, तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती, वारकरी संप्रदाय पाईक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आणि संतभूमी बचाव समिती यांचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *