मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
- मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले दान हे धर्मकार्यासाठीच वापरले गेले पाहिजे.
- रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्याचे काम शासनाचे आहे !
- हिंदूंनो, मंदिरात जमा होणार्या धनाचा योग्य प्रकारे विनियोग होण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्यासाठी शासनाकडे आग्रह धरा !
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे (सी.पी.आर्.) शासकीय रुग्णालयाच्या विकासासाठी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेटीतील उत्पन्नातून १ कोटी रुपयांची तरतूद (प्रावधान) करावी, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सी.पी.आर्. बचाव कृती समितीने १६ मे या दिवशी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाचा सकारात्मक विचार करण्याची ग्वाही जिल्हाधिकार्यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सर्वसामान्य व्यक्ती आणि विद्यार्थी यांना सामाजिक बांधिलकी जपत ५० लक्ष रुपयांचे विशेष प्रावधान प्रथमच केल्याविषयी जिल्हाधिकार्यांचे आभारही निवेदन देणार्या शिष्टमंडळाने मानले. (अशा कामांसाठी शासन, आमदार आणि खासदार यांच्या निधीतून पैसा उपलब्ध होत असतो. असे असतांना मंदिराच्या पैशाचा मनमानी पद्धतीने वापर करणार्या जिल्हाधिकार्यांवर प्रथम कारवाई करायला हवी, तसेच ५० लक्ष रुपये जिल्हाधिकार्यांच्या वेतनातून वसूल केले पाहिजेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
राज्यशासनाकडून मिळणार्या अपुर्या निधीमुळे सी.पी.आर्.मध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव कायम आहे. या गोष्टींची कमतरता दूर करण्यासाठी श्री सिद्धिविनायक आणि शिर्डी संस्थानाकडून दिल्या जाणार्या कोट्यवधी रुपयांच्या निधीप्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेटीतून रुग्णालयासाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्यात यावी, तसेच देवीच्या दर्शनासाठी येणार्या देश-विदेशांतील लक्षावधी भक्तांच्या दानधर्माच्या रकमेचा उपयोग गरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यासाठी व्हावा, यासाठी देवस्थान समितीने सी.पी.आर्. रुग्णालयासाठी आर्थिक निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (मंदिरातील निधीची मागणी करणार्या सी.पी.आर्. बचाव कृती समितीने कधी मशीद आणि चर्च यांच्याकडून निधीची मागणी कधी केली आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
निवेदन देणार्या शिष्टमंडळात सी.पी.आर्. बचाव कृती समितीचे निमंत्रक वसंत मुळीक, बबनराव रानगे, भगवानराव काटे, बाळासाहेब भोसले, भाऊसाहेब काळे, दिलीप पवार, समीर नदाफ, किशोर घाटगे, महादेव पाटील प्रताप नाईक आदींचा समावेश होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात