Menu Close

सर्वसमावेशक हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार करूया – सद्गुरु कु. स्वाती खाडये

सातारा येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’द्वारे हिंदुत्वाचा हुंकार !

सभेत बोलतांना सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

सातारा – जर भारतीय राज्यघटनेत समानतेचे तत्त्व आहे, तर सर्व धर्मियांना समान वागवले गेले पाहिजे; परंतु भारतात अल्पसंख्यांकांना संरक्षण, तर बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पूर्णत: शासकीय अनुदानातून चालणार्‍या शिक्षण संस्थांमध्ये कुठलेही धार्मिक शिक्षण देता येणार नाही, हे तत्त्व मान्य करायचे असेल, तर ते सर्वांसाठी लागू हवे; मात्र येथेही हिंदूंशी भेदभाव केला गेला आहे. यामुळे शासकीय अनुदानातून हिंदू वगळून अन्य धर्मियांना त्यांचे धर्मशिक्षण देण्यासाठी मदरसे अन् कॉन्व्हेंट शाळा चालू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यघटनेद्वारेच केला जाणारा हा अन्याय दूर करण्यासाठी हिंदूंनी सर्वसमावेशक अशा हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन सनातनच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. सातारा येथील गांधी मैदान येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त त्या बोलत होत्या.

या वेळी व्यासपिठावर हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती डाफळे उपस्थित होत्या. २ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चा लाभ घेतला.

दीपप्रज्वलनाने सभेचा प्रारंभ करतांना डावीकडून सद्गुरु स्वाती खाडये, सौ. भक्ती डाफळे आणि अधिवक्ता नीलेश सांगोलकर

शंखनाद झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर वेदमंत्रपठणाद्वारे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला आरंभ झाला.

हलाल उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा ! – अधिवक्ता निलेश सांगोलकर

हलाल ही इस्लामिक संकल्पना निधर्मी म्हणवणार्‍या भारतातील ७८ टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतामध्ये सरकारचे प्रमाणपत्र देणारे स्वतंत्र अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, तसेच अन्न आणि औषध प्रशासन हे विभाग आहेत. तरीही ‘जमियत उलेमा ए हिंद’, ‘हलाल ट्रस्ट’ यांसारख्या खासगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून सहस्रो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे भाग पाडत आहेत. जागतिक स्तरावर हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा आतंकवादासाठी उपयोगात आणला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि सुरक्षा यांना धोका निर्माण करणार्‍या हलाल उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा.

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायदा व्हावा ! – सौ. भक्ती डाफळे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

कायद्याचा धाक न राहिल्यामुळेच आज महाराष्ट्रात ‘श्रद्धा वालकर’, ‘रूपाली चंदनशिवे’ यांसारखी प्रकरणे घडत आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु युवती भरकटल्या असून त्या लव्ह जिहादसारख्या षड्यंत्राला बळी पडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र विधीमंडळात ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायदा झालाच पाहिजे.

हिंदु जनजागृती समितीच्या सातारा येथील कार्याचा आढावा समन्वयक श्री. हेमंत सोनवणे यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि अभारप्रदर्शन सौ. रूपाली महाडिक अन् श्री. राहुल कोल्हापुरे यांनी केले.

क्षणचित्रे

. सकाळी सभास्थळी स्वच्छता करतांना २ वेळा पक्षीराज गरुड याचे दर्शन झाले.

२. सभास्थळी विविध संस्था आणि संघटना यांची ग्रंथप्रदर्शने होती.

३. सभा झाल्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. काही महिलांनी उपनगरांमध्ये छोट्या सभा आयोजित करण्यासाठी समितीला निमंत्रित केले.

४. जिल्हा स्तरावर घेण्यात येणार्‍या आंदोलनात सहभागी होण्यासाठी वक्त्यांच्या आवाहनानंतर भ्रमणभाषच्या विजेरीच्या प्रकाशात दाखवून उपस्थितांनी अनुमोदन दिले !

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *