Menu Close

कोल्हापुरात ३० सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी हुंकार !

‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’च्या घोषणांनी कोल्हापूर हिंदुत्वमय !

कोल्हापूर शहरात निघालेला मोर्चा

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात १ जानेवारीला ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी  मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यासाठी ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदुत्वाचा हुंकार दाखवून दिला. मोर्च्याच्या समारोपप्रसंगी ‘सुदर्शन न्यूज चॅनल’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, हिंदुत्वनिष्ठ श्री. निळकंठ माने, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी यांनी उपस्थितांना संबोधित केले. हिंदुत्वनिष्ठ निलिमा देशपांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी सूत्रसंचालन केले. सकल हिंदु समाजाच्या वतीने विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता वंदूरकर-जोशी यांनी आभार मानले.

वक्त्यांचे ओजस्वी मार्गदर्शन

हिंदूंनो, राजकारण सोडा आणि धर्मकारण करा, तसेच धर्मासाठी प्रतिदिन १ घंटा द्या ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज चॅनल

मोर्च्यात मार्गदर्शन करतांना श्री. सुरेश चव्हाणके

एकीकडे हिंदू राजकीय पक्षात विभागले जात आहेत, तर दुसरीकडे गेल्या काही वर्षांत ५० लाख हिंदूंचे धर्मांतर झाले आहे. एकट्या उल्हासनगर भागात १ लाख २५ सहस्र हिंदूंचे धर्मांतर झाले आहे. यासाठी हिंदूंनो, राजकारण सोडा आणि धर्मकारण करा, तसेच धर्मासाठी प्रतिदिन १ घंटा द्या.

या प्रसंगी श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले

१. येणार्‍या काळात अश्‍लीलता पसरवणार्‍या पठाण चित्रपटावर आपण सर्वांनी बहिष्कार टाकला पाहिजे.

२. काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरात हिंदु युवकांनी त्यांचा विवाह होत नसल्याविषयी मोर्चा काढला. याऐवजी त्या हिंदु युवकांनी ‘लव्ह जिहाद’चे उगमस्थान असलेल्या जिहाद्यांच्या विरोधात मोर्चा काढणे आवश्यक आहे.

३. जे कोल्हापुरात होते, ते महाराष्ट्रात होते आणि जे महाराष्ट्रात होते, ते देशात होते. त्यामुळे आजचा मोर्चा हा धर्मविरोधकांना चपराक आहे.

हिंदु युवतींना स्वभाषा आणि धर्म स्वराष्ट्र यांचे शिक्षण दिल्यास एकही युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही ! – सौ. राजश्री तिवारी, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

मोर्च्यात मार्गदर्शन करतांना सौ. राजश्री तिवारी

आज हिंदु युवतींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी ‘लव्ह जिहाद’ केला जात आहे. यांतील काही युवतींना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात आहे. हिंदु माता-भगिनींनी त्या हिंदु धर्मात जन्माला आल्या, याविषयी अभिमान बाळगला पाहिजे. महिलांनी ‘त्या दुर्गेचे रूप आहेत’, ‘चंडीचे रूप आहेत’, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. हिंदु युवतींना लहानपणापासूनच स्वभाषा आणि हिंदु धर्म यांचे शिक्षण दिल्यास एकही युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही.

बिंदू चौक येथे प्रारंभी मर्दानी खेळ दाखवण्यात आले त्या प्रसंगी जमलेला हिंदू समुदाय

विरोधकांना चोख प्रत्त्युत्तर !

मोर्च्याच्या अगोदर काही पुरोगामी नेत्यांनी पोलीस अधीक्षकांकडे ‘मोर्च्यासाठी लावण्यात येणारे फलक आणि भीत्तीपत्रके यांवरील चित्रांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे’, अशी तक्रार केली होती, तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पत्रक काढून याला विरोध केला होता; मात्र हिंदूंनी सहस्रोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.

 

आपल्या मार्गदर्शनात श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले, ‘‘जे छत्रपती संभाजी महाराज यांना मानत नाहीत त्यांना आजपासून ‘अधर्मवीर’ म्हणण्यास प्रारंभ करा. केवळ हिंदूंकडून सगळ्या वस्तू खरेदी करा. कोल्हापूर जिहाद्यांपासून मुक्त झाला पाहिजे. त्याचप्रमाणे विशाळगडही महाशिवरात्रीच्या अगोदर अतिक्रमणापासून मुक्त झाला पाहिजे.’’

 

आजपर्यंत कथित पुरोगामी आणि काही राजकीय पक्ष कोल्हापूर ‘पुरोगामी’ असल्याचा आव आणत असत; मात्र आजच्या मोर्च्याने ‘कोल्हापूर हे हिंदूंचे शहर आहे’, हे हिंदुत्वनिष्ठांनी दाखवून दिले.

 

हिंदुत्वाचे बंधुत्व जपत सर्व हिंदूंसाठी आदर्श कोल्हापूरकर !

या मोर्च्यासाठी पाणी, सरबत, अल्पाहार आणि इतकेच काय, तर भोजनाची व्यवस्थाही कोल्हापूरमधील विविध संघटना यांनी हिंदूंसाठी केली होती. महाद्वार रोड व्यापारी असोसिएशन आणि सराफ व्यापारी असोसिएशन यांनी अल्पाहाराची सोय केली होती. या मोर्च्यात येणारे प्रत्येक जण हिंदू म्हणून सहभागी झाला होता. मोर्च्यानंतर अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच हिंदूंनी एकमेकांशी दीर्घकाळ हिंदुत्वाची विविध सूत्रांवर चर्चा केली.

उपस्थित संघटना, पक्ष आणि मान्यवर

भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक, राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर, श्री. महेश जाधव, श्री. अशोक देसाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख (शिंदे गट) श्री. किशोर घाटगे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार, श्री. विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शहरप्रमुख श्री. रविकिरण इंगवले, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री. हर्षल सुर्वे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी, श्री. मधुकर नाझरे, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, श्री. सचिन तोडकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई, श्री. आशिष लोखंडे, सुरेश यादव ‘वंदे मातरम् युथ फाऊंडेशन’चे श्री. अवधूत भाट्ये, सौ. श्‍वेता कुलकर्णी, सौ. सुप्रिया दळवी, किशोरी स्वामी, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, श्री. संभाजी साळुंखे यांसह संघटना बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन यांसह यांचे अनेक पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांसह अनेक संघटना, पक्ष यांचे मान्यवर उपस्थित होते.

विशेष

१. मोर्च्यातील महिला भगिनींचे रक्षण करण्याचे, तसेच मोर्चा शिस्तीत होण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

२. सगळ्यांना भगव्या टोप्या, भगवे ध्वज यांचे वाटप करण्यात येत होते, तसेच सगळ्यांना भगवा नाम ओढण्यात येत होता.

३. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेचे नेते श्री. राजेश क्षीरसागर यांनी प्रबोधन करणारे १०० फूट बाय ४० फूट होर्डिंग उभे केले होते.

४. सकाळी ९ वाजल्यापासूनच शहर परिसर आणि गावागावांतून हिंदू गटागटाने भगवे ध्वज घेऊन जमा होण्यास प्रारंभ करत होते.

५. मोर्च्याच्या प्रारंभी मर्दानी खेळ आणि युद्धकला यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यात लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी यांसह अन्य प्रात्यक्षिकेही दाखवली.

६. मोर्च्यासाठी भारतमाता, तलवार घेऊन कालीमाता यांची वेषभूषा केलेल्या युवती सहभागी झाल्या होत्या.

७. शहरात अनेक ठिकाणी हिंदूंनी उत्स्फूर्तपणे फलक, होर्डिंग, हस्तपत्रके यांद्वारे मोर्च्याचा प्रसार केला होता.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *