केंद्र सरकारकडून धोरणात पालट
नवी देहली – पाकिस्तानातील हिंदूही आता भारतात येऊन त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रायोजकत्व धोरणा’त पालट केला आहे. त्यामुळे आता ४२६ मृत पाकिस्तानी हिंदूंच्या अस्थी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जित केल्या जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मृत्यूपूर्वी या सर्वांनी त्यांच्या अस्थी भारतातील पवित्र गंगा नदीत विसर्जित करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती; मात्र प्रायोजकत्वाच्या धोरणामुळे त्यांची इच्छा अपूर्ण राहिली होती.
पूर्वीच्या प्रायोजकत्वाच्या धोरणानुसार ‘पाकिस्तानात रहाणार्या हिंदु कुटुंबाचे त्यांच्या भारतात रहाणार्या नातेवाइकांनी संबंधित हिंदु कुटुंबाला प्रायोजित (पाकिस्तानी हिंदूंच्या वतीने त्यांच्याकडील अस्थीकलशाचे भारतातील त्यांच्या नातेवाइकांनी गंगा नदीत विसर्जन करणे) करावे’, अशी तरतूद होती. त्यानंतरच त्याला व्हिसा देण्यात येत होता. आता पालटलेल्या धोरणानुसार, ‘मृत हिंदूंच्या कुटुंबियांना गंगेत अस्थी विसर्जित करण्यासाठी १० दिवसांचा व्हिसा दिला जाणार आहे.’ म्हणजेच जुन्या धोरणातील अट पाळावी लागणार नाही.
गंगा में अपने परिजनों की अस्थियां विसर्जन कर सकेंगे पाकिस्तानी हिन्दू, मोदी सरकार करेगी मदद https://t.co/TJ5GagW7sf https://t.co/m2BtXBwNC6 #narendramodi #ganga_river #pakistani_hindus @newstracklive
— News Track (@newstracklive) January 2, 2023
मृत हिंदूंचे अस्थिकलश वर्षानुवर्षे मंदिरात !
पाकिस्तानात असे अनेक हिंदू आहेत, जे त्यांच्या प्रियजनांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अस्थिकलश वर्षानुवर्षे मंदिरात किंवा स्मशानभूमीत सुरक्षित ठेवतात. त्यांना आशा होती की, एक ना एक दिवस ते त्यांच्या मृत प्रियजनांच्या अस्थी भारतातील गंगा नदीत विसर्जित करू शकतील. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे अशा लोकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात