नवी देहली : नऊ महिन्यांपूर्वीच देहलीच्या मध्यवर्ती भागातील औरंगजेब रोडला दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले असताना आता देहलीतील प्रसिद्ध अकबर रोडला महाराणा प्रताप सिंह यांचे नाव देण्याची मागणी परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांनी केली आहे.
मुघल बादशहा अकबरला रोखण्यात महाराणा प्रताप यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. सच्चा धर्मनिरपेक्ष आणि रयतेचा राजा अशी या राजपूत राजाची ओळख होती. त्यांच्या सैन्यात पठाण, भील्ल आणि आदिवासी अशा समाजातील विविध घटकांना स्थान होते. त्यांचे व्यक्तिमत्व अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून अकबर रोडचे ‘महाराणा प्रताप मार्ग’ असे झाल्यास तो त्यांचा उचित सन्मान ठरेल, असे व्ही. के. सिंह यांनी नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. दुर्देवाने महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा योग्य तो सन्मान आतापर्यंत होऊ शकलेला नाही, अशी खंतही सिंह यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी व्ही. के. सिंह यांनी अकबर रोडचे महाराणा प्रताप मार्ग असे नामकरण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन केले होते. त्यानंतर सिंह यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. याआधी सुब्रमण्यम स्वामी यांनीही ही मागणी केली होती. देहलीत सुमारे ३३ रस्त्यांना मुघल शासनकर्त्यांची नावे असल्याकडेही स्वामी यांनी लक्ष वेधले होते.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स