Menu Close

भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी बलसंपन्न समाजाची निर्मिती आवश्यक – सरसंघचालक

पणजी येथील सभेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप करतांना प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

पणजी – जीवनात भौतिक सुख मिळावे, यासाठी विज्ञानाने पुष्कळ प्रगती केली, तरीही सुखात वाढ झाली नाही. याउलट असमाधान, पर्यावरणाचा र्‍हास, कुटुंब विभक्त, युद्धासाठी अद्ययावत शस्त्रांची निर्मिती यांमध्येच वाढ झाली. आज जग यातून नवीन मार्ग शोधत असून त्यासाठी भारताकडे आशेने पहात आहे. भारताला विश्वगुरुपदावर नेण्यासाठी बलसंपन्न, सामर्थ्यवान अणि सर्व गुणांनी युक्त समाजाची निर्मिती होणे आवश्यक आहे, तरच देशात परिवर्तन होऊ शकते, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

रा.स्व. संघाने पणजी येथील बांदोडकर फुटबॉल मैदानात आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेत ते मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर कोकण प्रांत विभागाचे सहसंघचालक श्री. अर्जुन चांदेकर आणि गोवा विभागाचे संघचालक श्री. राजेंद्र भोबे उपस्थित होते. या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सभापती रमेश तवडकर हे संघाच्या गणवेशात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. सुलक्षणा सावंत याही उपस्थित होत्या. रा.स्व. संघाचे राष्ट्रीय अधिवेशन २ ते ६ जानेवारी या कालावधीत नागेशी, फोंडा येथे आयोजित करण्यात आले होते. यासाठी २ जानेवारीला प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत येथे आले होते. ७ जानेवारीला संघाच्या कांपाल, पणजी येथील सार्वजनिक सभेने राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता झाली. सभेसाठी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी दुपारी नागेशी येथून २.३० वाजता पणजी येथे प्रयाण केले.

भारत हे हिंदु राष्ट्र आहे !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत पुढे म्हणाले, ‘‘सर्व भारतियांचे जेवण-खाण, प्रथा-परंपरा, विचार निरनिराळे असले, तरी सर्वांचा ‘डी.एन्.ए. (गुणसूत्रे) एकच आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून, तर्क-वितर्कांतून आणि अनुभवातून आम्ही सर्व हिंदु असल्याचे सिद्ध होते. भारताला ओळखा, भारताला जाणा आणि भारतीय व्हा. भारत हे हिंदु राष्ट्र आहे. सर्व भाषा, सर्व पंथ, उपपंथ सर्वांचा सन्मान करा. सर्वांप्रती सद्भावना ठेवा. रा.स्व. संघाचे कार्य दुरून न पहाता संघाच्या कार्यात सहभागी व्हा आणि संघाचे कार्य जवळून जाणून घ्या. संघ शिकवत असलेली एक घंट्याची साधना दिनचर्या म्हणून स्वीकारा. संघाचे संस्कार घेऊन समाजातील त्रुटी सुधारण्यासाठी एखादे काम निवडून ते तन-मन-धनाने पूर्ण करा. स्वतःला विसरून देशासाठी काम करणे, हेच संघाचे काम आहे.’’

सरसंघचालकांकडून नागेश मंदिरातील सेवेकर्‍यांचा सत्कार !

२ ते ६ जानेवारी या कालावधीत नागेशी येथील नागेश महारूद्र देवस्थानात संघांचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. देवस्थानचे पदाधिकारी म्हणाले, ‘‘प.पू. सरसंघचालक डॉ. भागवतजी यांना नागेशी परिसरातील सोय पुष्कळ आवडली. यामुळे त्यांनी तेथील काही सेवेकर्‍यांचा सत्कार केला. सरसंघचालकांना गोव्यातील विविध मंदिरांतील सात्त्विकता जाणवली आणि प्रसन्न वाटले.’’

सभेला उपस्थित संघ स्वयंसेवक आणि इतर मान्यवर

क्षणचित्रे

१. सायंकाळी ५ वाजता असलेल्या सभेला सरसंघचालक ४ वाजून ४८ मिनिटे, म्हणजे वेळेपूर्वीच उपस्थित राहिले.
२. सभेपूर्वी उपस्थित स्वयंसेवकांनी व्यायामाची विविध प्रात्यक्षिके केली.
३. सभेच्या प्रारंभी ध्वजारोहण करून भगवा ध्वज फडकावण्यात आला आणि त्यानंतर संघाची प्रार्थना झाली. सर्वांनी उभे राहून ही प्रार्थना म्हटली.
४. बैठकीचे सूत्रसंचालन कोकणी भाषेत झाले. त्यामध्ये संघाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. संघाच्या स्थापनेला आणखी २ वर्षांनी १०० वर्षे पूर्ण होणार आहेत अणि तोपर्यंत देशात एक लाख शाखा चालू करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे, असे सूत्रसंचालकाने सांगितले.
५. सभेच्या ठिकाणी गोवा राज्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक, इतिहास, गोवा मुक्तीसाठी देशातील राष्ट्रभक्तांनी दिलेले योगदान याची माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यासह राष्ट्रीय विचारांचे साहित्य आणि गोशाळा यांचेही प्रदर्शन लावण्यात आले होते.
६. सरसंघचालकांचे हे मागदर्शन कर्णबधिरांना समजण्यासाठी विशेष सोय करण्यात आली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *