Menu Close

गीतेने सांगितलेले ज्ञान जीवनात उतरवणे आवश्यक – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

राजस्थानमध्ये हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ !

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत २१ ते ३० डिसेंबर या कालावधीत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी राजस्थानमधील जयपूर, अजमेर, भीलवाडा, चित्तोड, उदयपूर, नाथद्वारा, देसुरी, जोधपूर, पाली, सोजत रोड आदी शहरांमध्ये संपर्क केले. यामध्ये सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी जागृती कार्यक्रमासह हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्याशी संपर्क केले. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उदयपूरमधील महाराणा प्रताप गौरव केंद्राचे संचालक अनुराग सक्सेना आणि ‘श्री कुलम आश्रमा’मध्ये साध्वी श्री भुवनेश्वरी पुरी यांची भेट घेतली.

जोधपूर (राजस्थान) – आपण श्रीमद्भगवदगीतेला आपल्या घरी ठेवतो. काही लोक त्यातील अध्याय वाचतात; पण जीवनात प्रतिकूल परिस्थितीत गीतेच्या ज्ञानाच्या आधारे लढू शकत नाहीत. त्यामुळे गीतेने सांगितलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरवणे आवश्यक आहे. आत्मचिंतन आणि आचरण ही प्रक्रिया आवश्यक आहे. आपल्या घरी वाहन आहे; पण ते चालवता येत नसेल, त्या वाहनाचा उपयोग काय ? त्याचप्रमाणे जगातील सर्वांत मोठा वारसा गीतेच्या रूपात आपल्याकडे आहे; पण तिचा लाभ घेता येत नाही. म्हणून हिंदूंनी आचरणावर भर दिला पाहिजे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते महर्षि गौतम स्कूलमध्ये शिक्षकांसाठी आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करत होते. हा कार्यक्रम होण्यासाठी शाळेचे संचालक श्री. रविशंकर यांनी प्रयत्न केले.

महर्षि गौतम स्कूलमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. पिंगळे आणि श्री. आनंद जाखोटिया

‘मां गायत्री शक्तिपीठ, कालावाड’ यांच्या वतीने आयोजित ‘हिंदु आध्यात्मिक संस्कृतीवर एक चिंतन गोष्ट’ कार्यक्रम

धर्मशिक्षण आणि आचरण यांमुळे हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे रक्षण व्हावे ! – सदगुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘गायत्री शक्तिपीठ, कालावाड’ येथील कार्यक्रमात उपस्थित भक्तांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. पिंगळे

जयपूर (राजस्थान) – हिंदु धर्मानुसार आचरणाचे महत्त्व आणि त्याची वैज्ञानिकता आपल्याला घरोघरी पोचवावी लागेल. आज दिवाळीमध्ये फटाके आणि मिठाई यांची चर्चा अन् स्पर्धा होत असते. दीपावलीच्या एकेका दिवसाचे महत्त्व जर येणार्‍या नवीन पिढीला सांगितले नाही, तर हिंदु धर्माचे रक्षण कसे होईल ? त्यामुळे सण, सोळा संस्कार यांचे वैज्ञानिकता आणि महत्त्व आपल्याला येणार्‍या पिढीपर्यंत पोचवावे लागेल. धर्मशिक्षण आणि आचरण यांमुळे हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे रक्षण होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते ‘गायत्री शक्तिपीठ, कालावाड’ यांच्या वतीने येथील झुलेलाल मंदिरामध्ये आयोजित ‘हिंदु आध्यात्मिक संस्कृतीवर एक चिंतन गोष्ट’ या कार्यक्रमाला संबोधित करत होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू असलेले राष्ट्र्रविरोधी षड्यंत्राची माहिती दिली. मां भगवती गायत्री ट्रस्टचे सचिव श्री. प्रल्हाद शर्मा आणि श्री. रामाराय शर्मा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी ज्येष्ठ मान्यवर सर्वश्री गणपत वर्मा, सुभाषचंद्र झा, डॉ. भुवनेश गौड, डॉ. प्रभात शर्मा, पूज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष श्री. लोकचंदजी हरिरामानी उपस्थित होते.

अजमेर येथे धर्मप्रेमींच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन

अजमेर येथील बैठकीला उपस्थित धर्मप्रेमी

अजमेर – आज लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर अशा अनेक षड्यंत्रांच्या माध्यमातून हिंदूंवर अन्याय करण्यात येत आहे. हिंदू त्यांच्याच देशात असुरक्षित झाले आहेत. जर हिंदु समाज धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करील, तरच तो स्वसंरक्षणासह हिंदु धर्म आणि संस्कृती यांचेही रक्षण करू शकेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते धर्मप्रेमी श्री. भंवरसिंह राठौड यांच्या प्रयत्नांनी शास्त्री कॉलनीमध्ये आयोजित एका बैठकीला संबोधित करत होते. या कार्यक्रमाला आशा राठौड, राजेंद्रसिंह शेखावत, गोविंद कंवर, हुकूमसिंह विनोद कंवर, भीमसिंह राठौड, राजेंद्र सोनी, दयाशंकर शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी साधना, धर्म आदी विषयांशी संबंधित शंकांचे निसरन केले.

अजमेर येथील हिंदुत्वनिष्ठांशी चर्चा !

‘नाथजी का बगीचा’ येथे हिंदुत्वनिष्ठांसमवेत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

अजमेर – प्रारंभी येथील ‘नाथजी का बगीचा’मध्ये दर्शन घेऊन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘भारताला घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्र घोषित करणे, हा सर्व समस्यांवर उपाय आहे. आणीबाणीच्या वेळी आणि घटनाविरोधी पद्धतीने या देशाला ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) बनवण्यात आले. त्यामुळे आज हिंदू त्यांच्या मंदिरातील धन धर्मासाठी वापरू शकत नाहीत. तसेच आपल्या मुलांना शाळेच्या माध्यमातून आपल्या धर्म संस्कृतीचे शिक्षण देऊ शकत नाहीत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र अत्यंत आवश्यक आहे.’’

या वेळी अधिवक्ता विजय शर्मा, ‘हिंदु युवा वाहिनी’चे पंडित किसन शर्मा आणि श्री. राजेश शर्मा यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

हिंदु धर्म आणि संस्कृती समजून घेऊन जीवनात उतरवा !

गोला (अजमेर) येथे सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे ग्रामस्थांना मार्गदर्शन

गोला (अजमेर) येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

गोला – रक्षाबंधन आणि भाऊबीज केवळ भेटवस्तू देण्या-घेण्याचा सण नाही. यात भाऊ-बहीण यांचे एकमेकांच्या प्रती आणि दायित्व व्यक्त होते. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाच्या अपमृत्यूपासून रक्षणासाठी यमदेवतेला प्रार्थना करते आणि रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडून आपल्या सुरक्षेचे वचन घेते. हा भाव जर आपण विसरलो, तर आपली संस्कृती नष्ट होईल. म्हणून आपल्याला हिंदु धर्म आणि संस्कृती समजून घेऊन जीवनात उतरवावी लागेल, तरच आपले रक्षण होईल, असे प्रतिपादन सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी येथील ग्रामस्थांना संबोधित करतांना केले.

गुडघ्याला स्पर्श केल्याने नाही, तर शास्त्रानुसार चरणस्पर्श केल्याने लाभ होईल ! – सद्गुरु डॉ. पिंगळे

भीलवाडा – आज आपण विवाहाच्या वेळी शुभ मुहूर्त पाहतो; पण विवाह शुभ मुहूर्तावर होण्यासाठी आग्रही रहात नाही. नंतर नवदांपत्याच्या जीवनात समस्या आल्यावर आपण धर्माला दोष देतो. आज विवाहामध्ये विधी करण्याहून मनोरंजन, उच्छृंखलता आणि दिखावा यांना अधिक महत्त्व आले आहे. धर्मात चरणस्पर्श सांगितला आहे; परंतु सध्या गुडघ्यांना स्पर्श करून नमस्कार केला जातो. खरेतर चरणांमधून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आपल्याला चरणांना स्पर्श करूनच मिळते. ते गुडघ्यांना स्पर्श केल्यावर कशी मिळेल ? असे करून आपण आपली एक वैज्ञानिक प्रक्रिया आणि संस्कृती यांना नष्ट करत आहोत. हे थांबवण्यासाठी हिंदूंनी आपले धर्म, संस्कार आणि सण यांना समजून घेऊन जीवनात उतरवून त्यांचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. भीलवाडा येथे आयोजित केलेल्या धर्मप्रेमींच्या बैठकीला ते मार्गदर्शन करत होते.

भीलवाडा येथे आयोजित केलेल्या धर्मप्रेमींच्या बैठकीला मार्गदर्शन करतांना श्री. आनंद जाखोटिया आणि शेजारी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

या वेळी समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘हलाल प्रमाणपत्र आणि हलाल अर्थव्यवस्था’ यांविषयी उद्बोधन केले. या वेळी सौ. राखी मोदी यांनी समितीच्या कार्याचा परिचय करून दिला. श्रीमती कल्पना काबरा आणि श्री. संदीप काबरा यांनी सूत्रसंचालन अन् आभार प्रदर्शन केले. ‘भारत विकास परिषदे’चे जगदीशचंद्र काबरा, रजनीकांत आचार्य, ओमप्रकाश लढ्ढा आणि ‘महेश शिक्षा सदन’चे माजी मुख्याध्यापक श्री. राधेश्याम गग्गड उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण : भारत विकास परिषदेने विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिले.

उदयपूर येथील महाराणा प्रताप गौरव केंद्राचे संचालक अनुराग सक्सेना यांची घेतली भेट !

उदयपूर – येथील महाराणा प्रताप गौरव केंद्राचे संचालक श्री. अनुराग सक्सेना यांची सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भेट घेतली. या वेळी श्री. अनुराग सक्सेना यांनी प्रताप गौरव केंद्राविषयी माहिती दिली. या प्रसंगी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी श्री. सक्सेना यांना समितीच्या कार्याचा परिचय करून दिला. यानंतर श्री. सक्सेना यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. या वेळी समितीचे श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. प्रथमेश वाळके उपस्थित होते.

उदयपूरमध्ये श्री कुलम आश्रमामध्ये साध्वी श्री भुवनेश्वरी पुरी यांच्याशी भेट

साध्वी श्री भुवनेश्वरी पुरी यांना समिती पुरस्कृत ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

उदयपूर – येथील श्री कुलम आश्रमामध्ये सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी साध्वी श्री भुवनेश्वरी पुरी यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी त्यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू असलेल्या हलाल अर्थव्यवस्थेविषयी माहिती दिली. यासंदर्भात समितीने प्रकाशित केलेला ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथही त्यांना भेट म्हणून देण्यात आला. या वेळी साध्वीजी म्हणाल्या, ‘‘समिती पुरस्कृत ग्रंथ मला आवडतात आणि त्यांचे मी वाचन करते.’’ या वेळी साध्वीजींनी त्यांच्या आश्रमात चालवण्यात येणार्‍या ‘हिंदु संस्कारम् प्रमाणपत्र अभ्यासक्रमा’ची माहिती दिली आणि त्याविषयी विद्यार्थ्यांना आलेले अनुभव सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना सांगितले.

देसुरी येथील ग्रामस्थांचे करण्यात आले प्रबोधन !

देसुरी – येथे हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गाशी संबंधित श्री. चंद्रप्रकाश पुरी यांच्या प्रयत्नांनी स्थानिक धर्मप्रेमींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये ‘धर्माचरणाचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक प्रयत्न’, यांविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी माहिती दिली. या वेळी समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी हलाल प्रमाणपत्राविषयी उपस्थितांना अवगत केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *