घाटकोपर (मुंबई) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी कटीबद्ध होण्याचा धर्मनिष्ठांचा निर्धार !
घाटकोपर – पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसापुरती मर्यादित होती. आता मात्र ती केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, चिकित्सालयाशी संबंधित आस्थापने आणि मॉल यांनाही हलाल प्रमाणपत्र देण्यास आरंभ झाला आहे. यामुळे भविष्यात व्यापारी, उद्यमी, नागरिक, समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी मोठा धोका उद्भवू शकतो. यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समजून घेणे आणि त्यास विरोध करणे, हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले. सभेचे सूत्रसंचालन समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी समितीच्या कार्याची ओळख करून दिली. सभेला ५०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती लाभली, तर ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून ६०० हून अधिक धर्मनिष्ठांनी सभेचा लाभ घेतला.
हिंदु राष्ट्राच्या कार्यात तन-मन-धनाने सहभागी व्हा ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती
गेल्या २० वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्राची जोरकस मागणी करत आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेत आहे. परिणामस्वरूप देशातील हिंदु समाज जागृत झाला असून मनोमन हिंदु राष्ट्राचा संकल्प करत आहे. सभेत ज्या हिंदु राष्ट्राचा आपण उद्घोष करत आहोत, ते कालमाहात्म्यानुसार येणारच आहे. हिंदु राष्ट्राच्या कार्यात तन-मन-धनाने सहभागी व्हा. हिंदु राष्ट्रासाठी आपले कौशल्य पणाला लावा !
हिंदूंनो, शक्तीच्या उपासनेसह उपासनेची शक्तीही वाढवा ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था
आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी आध्यात्मिक शक्ती आणि हिंदूसंघटन यांची आवश्यकता आहे. हिंदूसंघटन करतांना हिंदूंच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करण्यासह उपासनेची शक्तीही वाढवण्याची आवश्यकता आहे.
हिंदु राष्ट्र जागृती सभेचा आरंभ सभेच्या आरंभी शंखनाद करण्यात आला. ‘वक्रतुंड महाकाय’ या श्लोकाचे पठण करण्यात आले. श्री. रमेश शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. ध्वनीफीतीवरून वेदमंत्रपठण करण्यात आले.
क्षणचित्रे
१. हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगणारा बालकक्ष सभेच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आला होता. राष्ट्रपुरुष आणि क्रांतिकारक यांच्या वेशभूषेतील बालसाधक या वेळी स्फूर्तीप्रद घोषणा देत होते.
२. समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी उपस्थितांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध रहाण्याची शपथ दिली. या वेळी उपस्थितांनी ‘हर हर महादेव’च्या घोषणा देऊन हात उंचावत अनुमोदन दिले.