वर्धा येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !
वर्धा – पाकिस्तानमधील दया भील या हिंदु महिलेची क्रूर हत्या करणार्यांना फाशीची शिक्षा देण्याची भारत सरकारने पाकिस्तानकडे मागणी करावी व पाकिस्तानमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर दबाव निर्माण करावा, तसेच केंद्र सरकारने जैन समाजाच्या ‘सम्मेद शिखरजी’ या पवित्र स्थळाला ‘तीर्थक्षेत्र’ घोषित करावे, या मागण्यांसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १४ जानेवारी या दिवशी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामध्ये भागवताचार्य ह.भ.प. सौ. लताताई तिवारी, श्रीराम मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष संजीव लाभे, विश्व हिंदु परिषद विदर्भ प्रांताचे धर्मप्रसारक अटल पांडे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय बडगिलवार, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अनिल कावळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे अतुल शेंडे, प्रशांत अवचट, रूपेश काशीकर, भारत विवेक मंचाचे जिल्हा संयोजक राहुल मून, दुर्गा वाहिनीच्या जिल्हा संयोजिका सौ. पल्लवी राऊत यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक, तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मान्यवरांचे विचार
१. श्री. संजय लाभे – पाकिस्तान हे अनैसर्गिकरित्या निर्माण झालेले राष्ट्र आहे. हिंदूंनी शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसून रहाणे आणि वस्तूस्थितीकडे दुर्लक्ष करणे, ही आत्महत्या आहे. तसे आपल्याला करायचे नाही. हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात जागृती निर्माण करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे हे आंदोलन आहे.
२. श्री. अटल पांडे – स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपण महापुरुषांचा पराक्रम विसरलो. त्यामुळे हिंदूंना सातत्याने अन्याय सहन करावा लागत आहे. हे थांबवण्यासाठी सर्व हिंदूंनी जातपात विसरून संघटित व्हावे.
३. श्री. संजय बडगिलवार – पाकिस्तानमध्ये दया भिल या हिंदु महिलेवर अन्वन्वित अत्याचार करून तिला हाल हाल करून ठार मारण्यात आले. अशा हिंदूंसाठीच भारताने ‘सीएए’ कायदा बनवला आहे; पण त्यालाही विरोध करण्यात आला. त्यांना भारताविना पर्याय नाही. त्यामुळे त्यांना भारतात आश्रय मिळाला पाहिजे.
४. ह.भ.प. सौ. लता तिवारी – अन्यायाच्या विरोधात सर्व हिंदूंनी संघटित झाले पाहिजे.
५. सौ. पल्लवी राऊत – पाकिस्तानप्रमाणे भारतातही लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होतात. त्याविरोधात संघटित झाले पाहिजे.