‘काश्मीरमधील आतंकवाद कधीपर्यंत ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
(टीप : ‘ऑपरेशन ऑल क्लिन’ म्हणजे सैन्याची आतंकवाद मुक्तीसाठीची योजना)
काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये ३३ वर्षांनंतरही पुनर्वसन होऊ न शकणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! -संपादक
मुंबई – कलम ३७० (जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम) हटवल्यानंतरही काश्मिरी हिंदूंच्या स्थितीत फरक पडलेला नाही. काश्मीरला आतंकवादापासून मुक्त करायचे असेल, तर ‘ऑपरेशन ऑल क्लिन’ पूर्ण करावे लागेल. काश्मिरी हिंदूंना विस्थापित होण्यास उत्तरदायी कोण ? हे निश्चित करून त्यांना शिक्षा ठोठावली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘काश्मीरमधील आतंकवाद कधीपर्यंत ?’ या ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.
श्री. राहुल कौल यांनी काश्मीर आणि हिंदू यांच्याविषयी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे
काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन म्हणजे देशातून जिहादी आतंकवाद संपवण्यासारखे !
कलम ३७० हटवल्यानंतर आतंकवादाच्या मोठ्या घटना बंद झाल्या. दगडफेक थांबली; पण हिंदूंना अजूनही वेचून मारले जात आहे. सरकार ‘सॉफ्ट टेररिझम’ (सौम्य आतंकवाद) मान्य करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे देशात चुकीचा संदेश जाऊ शकतो. सरकारच्या या धोरणामुळे अन्यत्र छोटे काश्मीर निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे म्हणजे संपूर्ण देशातून जिहादी आतंकवाद संपवण्यासारखे आहे.
जम्मूतील हिंदु बांधवांना तेथेच स्थायिक करून त्यांना वेतन देण्यात यावे !
सरकारने ४ सहस्र काश्मिरी हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये नोकरी दिली; पण त्यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांनी जम्मूमध्ये स्थलांतर केले आहे आणि तेथेच ते स्थायिक होण्याची मागणी करत आहेत. गेले ८ मास जम्मूतील संक्रमण शिबिरांमध्ये (ट्रांझिट कँप) विनावेतन रहात असलेले हे हिंदू आंदोलन करत आहेत. ते काश्मीरमध्ये रहात नसल्याने त्यांचे वेतन रोखून धरण्यात आले आहे. तरी जम्मूमध्ये आंदोलन करत असलेल्या हिंदू बांधवांना त्यांचे थकित वेतन मिळावे आणि त्यांना जम्मूतच स्थायिक करावे.
जेव्हा नरसंहार नाकारला जातो तेव्हा त्याची पुनरावृत्ती होते !
‘सेक्युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) जाणीवपूर्वक हिंदूंचा नरसंहार झालाच नाही, तर मुसलमानही मारले गेल्याचे सांगून नरसंहाराची धग अल्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ष १९९० पासून काश्मीरमध्ये हिंदु नरसंहाराच्या २२ मोठ्या घटना घडल्या. वर्ष २०१९ पासून २२ हिंदूंना वेचून मारण्यात आले. ५ लाख हिंदू काश्मीरमधून विस्थापित आहेत, हे या वेळी लक्षात घ्यायला हवे. जेव्हा नरसंहार नाकारला जातो, तेव्हा त्याची पुनरावृत्ती होते, हा मोठा धोका आहे. त्यामुळे देशभरात ‘काश्मिरी हिंदु वंशविच्छेद (जिनोसाईड) विधेयक’ लागू करावे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात