शाम मानव यांनी रायपूर येथे यावे, ३० लाख रुपयांची आवश्यकता नाही ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनी दिलेले आव्हान आता शाम मानव स्वीकारणार आहेत कि अन्य कारण सांगून पळ काढणार आहेत ? -संपादक
भोपाळ – बागेश्वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे; मात्र समितीचे ३० लाख रुपयांचे पारितोषिक त्यांनी नाकारले आहे. मानव यांच्या सर्व प्रश्नांची विनामूल्य उत्तरे देण्यात येतील. त्यासाठी समितीच्या सदस्यांना २० आणि २१ जानेवारी या दिवशी रायपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या दरबारात यावे लागेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या प्रवासाचा व्ययही आमच्याकडून देण्यात येईल, अशी घोषणाही पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनी केेली आहे.
शाम मानव यांचे आव्हान काय होते ?
नागपूर येथे ५ ते १३ जानेवारी या कालावधीत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांचा रामकथेवर आधारित कथा वाचनाचा कार्यक्रम झाला होता. तिथे त्यांनी त्यांचा दैवी दरबार भरवला होता. त्यानंतर या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि नागपूर येथील जादूटोणा विरोधी जनजागृती प्रचार प्रसार समितीचे सहअध्यक्ष शाम मानव यांनी पोलिसांकडे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती.
९ जानेवारी या दिवशी अमरावती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्याम मानव म्हणाले होते की, धीरेंद्रकृष्णजी शास्त्री महाराज रामकथेच्या नावावर दिव्य दरबार आणि प्रेत दरबार आयोजित करत आहेत. महाराजांचा दरबार हा भीतीचा दरबार आहे. या दरबारावर कारवाई केली जावी. त्यांचे दिव्यशक्तीचे दावे आणि प्रयोग हे महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार आणि ‘ड्रग्ज अँड मॅझिक रिमेडिस अॅक्ट’नुसार गुन्हेगारी कृत्य आहे. हे या कायद्याचे उल्लंघन आहे. दैवी दरबारात ते भक्तांचे नाव आणि संख्या यांवरून अनेक गोष्टी सांगण्याचा दावा करतात. त्यांचे असे व्हिडिओ आम्ही पाहिले होते. त्यांनी असे दावे आणि दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवावी अन् ३० लाख रुपयांचे पुरस्कार मिळवावे, असे आव्हान दिले होते. त्यानंतर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज म्हणाले होते की, गेल्या ७ दिवसांपासून नागपूर येथे रामकथा आयोजित केली होती. त्या वेळी कुणी आव्हान दिले नाही; मात्र कथेवरून परत येताच सनातन धर्माच्या विरोधकांनी अपप्रचार चालू केला आहे, असे उत्तर दिले होते.
आम्ही कथेचे मंडप सोडून पळून गेल्याचा आरोप चुकीचा ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजपंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांची रायपूर (छत्तीसगड) येथे कथा चालू आहे. तेथे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, ‘‘तुम्ही संसारात अडकू नका. भूत आणि पिशाच जवळ येऊ नये, हे चुकीचे आहे का ? हा आंधळा विश्वास आहे का ? महाराष्ट्रात आम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, तसेच ते कधीही करणार नाही. देव आहे कि नाही म्हटले, तरी अनुभव घ्यावा लागेल. आम्हाला देव जे काही प्रेरणा देईल, ते आम्ही सांगू. आमचा आमच्या देवावर विश्वास आहे. मी आव्हानाला सामोरे गेलो नाही, अशी चुकीची माहिती सांगितली जात आहे. आम्ही कथेचे मंडप सोडून पळून गेलो, असा आरोप करणे चुकीचे आहे. आमच्या दरबारासाठी ३० लाख रुपये पारितोषिक ठेवले जात आहे; पण ते आम्हाला नको. अंनिसवाल्यांनी थेट रायपूर येथे यावे, त्यासाठी लागणारा व्ययही आम्ही देऊ. आम्ही त्यांना साहाय्य करतो.’ |
स्रोत: दैनिक सनातन प्रभात