‘एकच लक्ष्य, एकच ध्येय ! हिंदु राष्ट्र, हिंदु राष्ट्र ! या घोषणांनी कुडाळ शहर दुमदुमले !
कुडाळ: ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय ! हिंदु राष्ट्र, हिंदु राष्ट्र !’ या घोषणा देत भगवा ध्वज लावलेल्या दुचाकींसह निघालेल्या वाहनफेरीने कुडाळ शहर दुमदुमून गेले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी २०२३ या दिवशी शहरातील कुडाळ हायस्कूलच्या मैदानात आयोजित केलेल्या सार्वजनिक हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ ही फेरी काढण्यात आली. या वेळी ‘हिंदूंनो, सहस्रोंच्या संख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी करा’, असे आवाहन करण्यात आले.
म्हापसेकर तिठा, पिंगुळी येथे धर्माभिमान श्री. यशवंत परब गुरुजी यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधीवत् पूजन करण्यात आले. पुरोहित श्री. आदित्य चिंचळकर यांनी या वेळी पौरोहित्य केले. तेर्सेबांबर्डे सरपंच श्री. रामचंद्र परब यांनी धर्मध्वजाला हार अर्पण केला. त्यानंतर धर्माभिमानी श्री. विवेक पंडित यांच्या हस्ते श्रीफळ वाढवल्यानंतर फेरी मार्गस्थ झाली. त्यानंतर कुडाळ शहरातून मार्गस्थ होत जिजामाता चौक येथे आल्यावर फेरीची सांगता झाली. या फेरीत भाजपचे राजू राऊळ, बंड्या सावंत, भाजपचे युवामोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, घनश्याम परब, हेमंत जाधव, साईराज जाधव, सागर वालावलकर, रजत बबडी, संदेश शेलटे, स्वप्नील तेली, आदित्य राऊळ, सदा घाडी, पंकज गावडे, प्रख्यात काणेकर, प्रथमेश डिगसकर, रमाकांत नाईक, दैवेश रेडकर आणि हेमंत जाधव यांच्यासह हिंदु जनजागृती समिती आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग या संघटनांच्या कार्यकर्त्यांसह १०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.
क्षणचित्रे :
१. फेरीच्या प्रारंभी पिंगुळी तिठा येथील श्री सिद्धविनायक मंदिरात वाहनफेरी आणि राष्ट्र-जागृती सभा यांच्या यशस्वीतेसाठी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून गार्हाणे घालण्यात आले.
२. फेरीच्या मार्गात कुडाळ येथे डॉ. गुरुप्रसाद सौदत्ती आणि श्री. रामचंद्र उपाख्य दादा बल्लाळ यांनी धर्मध्वजाचे पूजन केले.
३. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी, तसेच जिजामाता चौक येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला भाजपचे राजू राऊळ आणि श्री. हेमंत जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला.
४. फेरीच्या प्रारंभापासून ते सांगतेपर्यंत कुडाळ पोलिसांचे चांगले सहकार्य लागले.