कुडाळ: छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण ताठ मानेने जगतो आहोत; म्हणून तो इतिहास विसरून चालणार नाही. बहुसंख्येने असलेल्या हिंदूंच्या भारतात सनातन हिंदु धर्माचा आदर करून कायदे बनवले गेले पाहिजेत. सेक्युलर व्यवस्थेला पर्याय म्हणून हिंदु राष्ट्र स्थापन करावे लागेल. हे करण्यासाठी शिवाजी महाराजांप्रमाणे साधनाही केली पाहिजे. वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्ट्रात साजरा केला जाईल, असे प्रतिपादन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी शहरातील कुडाळ हायस्कूलच्या पटांगणात झालेल्या सार्वजनिक हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये मार्गदर्शन करत होत्या. या सभेला ४ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती होती.
सभेच्या प्रारंभी शंखनाद, त्यानंतर सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वंदनीय उपस्थितीत आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्यांचे समन्वयक श्री. मनोज खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. आनंद मोंडकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी करून दिली.
सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘सनातन हिंदु धर्म हा हिंदु राष्ट्राचा प्राण आहे. अनादि काळापासून सनातन हिंदु धर्मातील सिद्धांतानुसारच भारताची राज्यव्यवस्था कार्यरत होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज देशात निधर्मीपणाचा (‘सेक्युलर’पणाचा) गवगवा होत आहे; पण या ‘सेक्युलर व्यवस्थेमुळे हिंदु पिढी उद्ध्वस्त होत आहे. धर्म विसरल्यामुळे विविध प्रकारच्या जिहादांना हिंदू बळी पडत आहेत. हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. आज चित्रपटांतून हिंदूंच्या देवीदेवतांची विटंबना केली जाते. हे करतांना त्यांना भीती वाटत नाही; कारण त्यांना माहिती आहे की, हिंदू स्वतःचे कुटुंब, स्वतःचा व्यवसाय यात गुरफटलेले आहेत. त्यांच्यामध्ये धर्माभिमान राहिलेला नाही. ही स्थिती आपल्याला पालटायची आहे; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी आवाज बुलंद करायचा आहे. अशा सभांच्या माध्यमातून हिंदूंना जागृत करायचे आहे.’’
संतांचा सन्मान आणि मान्यवरांचा सत्कार
मुळदे, कुडाळ येथील प.पू. घडशी महाराज यांचा सन्मान देवगड येथील सनातनचे साधक श्री. भास्कर खाडीलकर यांनी केला.
सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान कुडाळ येथील श्री. वासुदेव सडवेलकर यांनी, तसेच सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान कुडाळ येथील धर्मप्रेमी सौ. अश्वीनी गावडे यांनी केला.
श्री. मनोज खाडये यांचा सत्कार तेर्सेबांबर्डे गावचे सरपंच श्री. रामचंद्र परब यांनी केला. श्री. नीलेश सांगोलकर यांचा सत्कार तेर्सेबांबर्डे येथील धर्मप्रेमी श्री. रूपेश कानडे यांनी केला.