हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार करतांना आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून चिंतन करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
नवी देहली – आज आपण हिंदु राष्ट्र भारत आणि हिंदु जगताचा विचार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. जागतिक परिस्थिती, व्यवस्था, समस्या आणि उपाय योजना यांवर चर्चा करतांना आपल्याला आध्यात्मिक अन् धार्मिक दृष्टीकोनातून चिंतन करणे आवश्यक आहे. जेव्हा हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे आचरण करतील तेव्हा हिंदूंची आध्यात्मिक शक्ती अधिक जागृत होईल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये जागतिक हिंदु महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या ‘जागतिक हिंदु परिषदे’मध्ये ते मार्गदर्शन करत होते. या परिषदेत भारतासह मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, श्रीलंका, फिजी, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो, नेदरलँडस् यांसह एकूण १८ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नेपाळच्या स्वामी हेमानंद गिरीमाता होत्या.
या परिषदेत जागतिक हिंदु महासंघाचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी ‘इमर्जिंग ऑफ हिंदु राष्ट्र’ या विषयावर, ‘हिंदूंचे समर्थन (advocacy)’ या विषयावर त्रिनिदाद आणि टोबॅगोचे राजदूत डॉ. गोपाल यांनी अन् ‘हिंदुविरोधी शक्तींचा सामना कसा करायचा ?’, या विषयावर महासंघाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय सिंग यांनी उपस्थितांना संबोधित केले.
जागतिक हिंदु महासंघाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय सिंग यांनी हिंदु जनजागृती समितीविषयी काढलेले गौरवोद़्गार
हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय घेऊन भारतभर प्रभावी कार्य करत आहे. विशेष करून आध्यात्मिक स्तरावर राष्ट्रकार्य करणारी एकमेव संघटना आहे.
अन्य मान्यवरांनी केलेले उद़्बोधन
१. इंडोनेशियाचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभु धर्मेशा : इंडोनेशियातील बाली प्रांतातील हिंदूंची लोकसंख्या ९० लाखांवरून १ कोटी १० लाख झाली आहे, तर इतर देशांतील हिंदूंची लोकसंख्या सातत्याने न्यून होत आहे.
२. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे माजी उपपंतप्रधान डॉ. चंद्रेश शर्मा : त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये १०० हून अधिक मंदिरे, ५० हून अधिक हिंदू शाळा आणि कॅरेबियन देशांमधील सर्वांत मोठी हनुमानाची मूर्ती आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या समृद्धीच्या मागे भारतीय वंशाच्या लोकांचे योगदान पुष्कळ आहे.
३. डॉ. अजय सिंग, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, जागतिक हिंदु महासंघ : आम्ही हिंदु संघटनांची शिखर संस्था आहोत. आम्ही त्यांची छत्रछाया असलेली संघटना असल्यामुळे जगभरातील हिंदूंच्या एकतेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हिंदूंना त्यांच्या एकजुटीने जगातील सर्व हिंदूंभोवती एक भक्कम बाजूबंदी करावी लागेल, ज्यामध्ये इतर कोणत्याही धर्माची घुसखोरी होणार नाही. तसेच अन्य पंथियांना धर्मांतराची संधी मिळणार नाही.