श्रीराम मंदिराची उभारणी, तसेच गोहत्या आणि धर्मांतर बंदी करण्याची शंकराचार्य यांच्या उपस्थितीत भारत साधू समाजाच्या अधिवेशनात संतांची मागणी !
उज्जैन : देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याला धर्मनिरपेक्ष करण्यात आले, ज्याचा अर्थ होतो की, कोणाताही भेदभाव केला जाणार नाही; पण हिंदूच याचे बळी पडले आहेत. सनातन धर्मावरच आघात होऊ लागले आहेत. चोहोबाजूने धर्माला तोडण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. लोकशाहीला पैशाद्वारे विकत घेतले जात आहे. या देशावर भाजप, काँग्रेस किंवा कोणाचेही राज्य असो, हिंदु धर्माची अवहेलना सहन केली जाणार नाही, अशी कडक चेतावणी द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी भारत साधू समाजाच्या अधिवेशनात वार्ताहारांशी बोलतांना दिली. या अधिवेशनात १४ ठराव संमत करण्यात आले. त्यात प्रामुख्याने अयोध्येेत श्रीराममंदिराची उभारणी, देशभरात गोहत्या बंदी अन् धर्मांतर बंदी अधिनियम करण्याची मागणी करण्यात आली.
शंकराचार्य पुढे म्हणाले, लोकांच्या मनात देव आणि धर्म यांविषयी भीती राहिली नसल्याने राष्ट्राची दुर्दशा झाली आहे. पूर्वी पाठ्यक्रमातून गीता, रामायण शिकवले जात होते, लोक धर्मपरायण होते; पण आता सरकार असे करत नाही आहे. रामायण मालिकेतून देशातील युवकांच्या मनावर मोठा सांस्कृतिक प्रभाव निर्माण झाला होता; पण त्याचा धर्मरक्षणासाठी वापर न करता त्याला राजकारणात वळवण्याचा प्रकार करण्यात आला.
या देशातील तरुण पिढी धर्मापासून विन्मुख नाही; पण त्यांना देशाची संस्कृती शिकवली जात नाही. देशात स्मार्ट सिटीच्या योजना बनत आहेत; पण त्यात कुत्रे असतील, गायी आणि वृक्ष नसतील.
उपस्थित संत
या वेळी श्री पंच अग्नि पीठाधीश्वर महंत श्री रामकृष्णानंद महाराज, प.पू. गोपालानंद महाराज, रसिक पीठाचे जन्मेजयशरण महाराज, महामंडलेश्वर स्वामी सत्यानंदगिरी महाराज, महामंडलेश्वर संतोषदासजी महाराज, महामंडलेश्वर राजेंद्रदासजी महाराज, दंडी स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी महाराज, भारत साधू समाजाचे राष्ट्रीय महामंत्री श्री हरिनारायणानंद महाराज आणि अन्य संतगण उपस्थित होते.
शंकराचार्यांच्या उपस्थितीत भारत साधू समाजाच्या अधिवेशनात संतांनी संमत केलेले काही ठराव !
१. अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर उभारण्यात यावे.
२. धर्मांतर बंदी अधिनियम करण्यात यावे.
३. गंगाजल प्रदूषणावर नियंत्रण करण्यात यावे.
४. गोवध नियंत्रण आणि हिमालय तीर्थ संरक्षण करण्यात यावे.
५. महिलांचे अश्लील चित्र आणि भ्रमणभाषमध्ये (मोबाईलमध्ये) वाढत असलेली अश्लीलता थांबवण्यात यावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात