Menu Close

विश्वस्तांनी एकत्रित कार्य केल्यास मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही ! – अशोक जैन, विश्वस्त, पद्मालय देवस्थान, जळगाव

जळगाव येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेला प्रारंभ !

डावीकडून श्री. रमेश शिंदे, दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव, आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदास महाराज, अधिवक्ता विष्णु जैन, राजे श्री. विजयसिंह जाधव, श्री. अशोक जैन

जळगाव, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. मंदिरे भाविकांच्या अंत:करणात श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरांतील पूजाअर्चा नियमित होणे, मंदिरांचा कारभार पारदर्शक होणे, तसेच मंदिरांच्या व्यवस्थापनेमध्ये गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन सुदृढ होत आहे. कोणत्याही संस्था सुदृढ होणे, हे तिच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी मात्र असा कोणताही अभ्यासक्रम शिकवला जात नाही. मंदिर परिषदेच्या माध्यमातून हे कार्य होत आहे. संघटना आणि शासन यांमध्ये सुसंवाद ठेवणार्‍या माध्यमांचीही यासाठी आवश्यकता आहे. मंदिराच्या व्यवस्थापकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिरांकडे पालकत्वाच्या भावनेने पहाणे आवश्यक आहे. तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. त्यांचा अभ्यास करायला हवा. तीर्थक्षेत्रे ही पर्यटनस्थळे नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. विश्वस्तांनी हातात हात घेऊन मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र यायला हवे. त्यामुळे मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही. समस्यांवर त्वरित तोडगा निघेल. आंदोलनाविना मार्ग नाही, हे विश्वस्तांनी लक्षात घ्यायला हवे. मंदिर परिषदेच्या माध्यमातून यासाठीचा समान कार्यक्रम निश्चित होईल, असे प्रतिपादन जळगाव येथील पद्मालय देवस्थानचे विश्वस्त अशोक जैन यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपति मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ (पद्मालय, जळगाव) यांच्या वतीने मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ जळगाव येथे २ दिवसीय ऐतिहासिक अशा पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनसत्रात ते बोलत होते. संत-महंत यांच्या वंदनीय उपस्थितीत मंगलमय वातावरणात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या परिषदेला प्रारंभ झाला. राज्यभरातील विविध मंदिरांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

अशोक जैन

या वेळी व्यासपिठावर काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज, देऊळगावराजा (जिल्हा बुलढाणा) येथील बालाजी देवस्थानचे राजे श्री. विजयसिंह जाधव, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे उपस्थित होते.

परिषदेला शंखनादाने प्रारंभ झाला. त्यानंतर श्री गणेशवंदन झाले. जळगावचे ग्रामदैवत श्रीराम आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करण्यात आले. दीपप्रज्ज्वलन आणि वेदमंत्रपठण झाले. या वेळी वेदमूर्ती श्रीराम जोशी, संतगण, तसेच व्यासपिठावरील मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला. जळगाव समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभसंदेशाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रियंका लोणे आणि श्री. बळवंत पाठक यांनी केले.

‘मंदिर प्रतिनिधींच्या एकत्रिकरणाची आवश्यकता’, महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेची भूमिका, पुजार्‍यांच्या अडचणी आणि उपाय, मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंचे संघटन, मंदिरांचे सुप्रबंधन, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, स्वच्छता, आर्थिक अडचणी अशा विविध विषयांवर या परिषदेत ऊहापोह होणार आहे.

मंदिरांतील पूजाविधींचा अभ्यासक्रम सिद्ध करणे आवश्यक ! – आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज, काळाराम मंदिर

आचार्य महामंडलेश्‍वर श्री महंत सुधीरदास महाराज

६४ कलांमधून पूजाविधीची निर्मिती झाली आहे. पूजापद्धतीमधून देवतांच्या चैतन्याचे आवाहन केले जाते. पुरुषसूक्तामध्ये देवतांना आवाहन करण्याचे सामर्थ्य आहे. सध्या याविषयी अभ्यास नसलेल्या पुजारांची नियुक्ती मंदिरांमध्ये केली जाते. शास्त्रयुक्त पूजाविधीच्या अभावामुळे मंदिरातील पावित्र्यता नष्ट होत आहे. पावित्र्यता टिकवून ठेवण्यासाठी मंदिरांतील पूजाविधींचा अभ्यासक्रम सिद्ध करणे आवश्यक आहे. मंदिरातील परंपरागत विविध पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. मंदिरातील देवतेच्या तत्त्वामुळे मंदिरात येणार्‍या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. अयोग्य पूजाविधीने मंदिरातील पावित्र्य नष्ट होऊन भाविकांना देवतेच्या तत्त्वाची प्रचीती येत नाही. त्यामुळे मंदिरांमध्ये शास्त्रोक्त पूजाविधी होईल, याची काळजी घ्यायला हवी. या परिषदेच्या माध्यमातून समुद्रमंथनरूपी विचारमंथन होऊन मंदिराना गतवैभव प्राप्त होईल.

मंदिर परिषदेचे आयोजन म्हणजे हिंदूंसाठी शुभकल्याणकारी घटना ! –  सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव

अध्यात्माच्या दृष्टीने देवालय म्हणजे भगवंताचा साक्षात वास असणारे पवित्र स्थान ! अलीकडेच पुणे येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल यांनी केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष आहे की, मंत्र आणि मंदिरे ही विकार (आजार) बरे करणारे ऊर्जास्रोत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात हिंदूंना विनामूल्य मनःशांती देणारे आणि आनंदप्राप्तीच्या आंतरिक ओढीपोटी ईश्वराशी अनुसंधान साधण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे मंदिरे आहेत. वैयक्तिक जीवनासह सामाजिक जीवनातही मंदिराचे स्थान अनन्यसाधारण आहे. मंदिरांतूनच हिंदूंची संस्कृती आणि परंपरा यांचे जतन अन् संवर्धन होत असते. अशा मंदिरांच्या हितांसाठी परिषद होत आहे, ही हिंदु समाजासाठी शुभकल्याणकारी घटना आहे.

मंदिर विश्वस्तांच्या संघटनासाठी मंदिर-न्यास परिषद महत्त्वाची ठरेल ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

कलियुगात संघटित राहिल्यानेच बळ प्राप्त होते. राजकीय पक्ष राजकीय व्यक्तींचे संघटन करतात. महिलांचे संघटन असते. अगदी हॉटेल चालकांसह सर्वस्तरावर संघटन असते, मग देवालयांचे संघटन का असू नये ? मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, व्यवस्थापक, मंदिरांचे कार्य करणारे कार्यकर्ते आणि अधिवक्ते यांच्या संघटनासाठी ही परिषद आहे. मंदिर विश्वस्तांच्या संघटनासाठी ही मंदिर-न्यास परिषद महत्त्वाची ठरेल.

काशी विश्वनाथ मंदिरासाठीचा लढा हा हिंदु संस्कृतीरक्षणाचा लढा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

काशी विश्वेश्वर मंदिर ३ वेळा तोडण्यात आल्याचे वर्ष १९९७ मध्ये एका खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे या ठिकाणी मंदिर होते, हे आम्हाला न्यायालयात सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. औरंगजेबाने काशीविश्वेश्वराचे मंदिर तोडण्यासाठी काढलेले ‘फर्मान’ (आदेश) आम्ही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. वर्ष १९३६ मध्ये ब्रिटिश सरकारनेही काशीविश्वेश्वर मंदिर हे वक्फ मंडळाची भूमी नसून हिंदूंचे श्रद्धास्थान असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. काशी विश्वेश्वराचे मंदिर ३ वेळा पाडण्यात आले; परंतु ‘सर तन से जुदा’ म्हणत हिंदू रस्त्यावर उतरले नाहीत. ‘काशी विश्वेश्वराचे मंदिर मुक्त करावे’, ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची इच्छा होती. मंदिरे ही सनातन संस्कृतीमधील अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे आक्रांतांनी कह्यात घेतलेली सर्व मंदिरे हिदूंनी मुक्त करायला हवीत. काशी विश्वनाथ मंदिरासाठीचा लढा हा हिंदूंच्या संस्कृतीरक्षणाचा लढा आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *